छत्रपती संभाजीनगर : वाळूज औद्योगिक वसाहतीला लागूनच असलेल्या राजणगाव शेणपुंजी गावातील मंगलमूर्ती ज्वेलर्समध्ये शिरून चाकूचा धाक दाखवत दुकानातील तब्बल १२ लाख ४० हजाराचा ऐवज चोरट्यांनी मंगळवारी भरदिवसा लुटून नेला. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
हेही वाचा >>> हातात एके-४७ बंदूक घेऊन मंदिरात शिरलेल्या ‘त्या’ दहशतवाद्याला तरुणाने दिला चोप, नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी वाळूज जवळच असलेल्या रांजणगावात जाणार्या मुख्य रोडवर कमळापूर फाट्यालगतच मंगलमूर्ती ज्वेलर्स या नावाने सोन्या-चांदीचे दुकान आहे. दुकानदार मुंकुद उत्तमराव बेंद्रे हे वाळूजच्या सिडको वाळूजमहानगर -१ येथे राहतात. नेहमीप्रमाणे त्यांनी मंगळवारी सकाळी आपले दुकान उघडून व्यवहार सुरू केला. सकाळचे साडेदहा वाजण्याच्या सुमारास २५ ते ३० वयोगटातील तीन चोरट्यांनी या दुकानात प्रवेश केला. प्रथम चोरट्यांनी त्यांच्या दुकानचे शटर बंद करून मालकावर लक्ष केले. त्यांच्या तोंडात बोळे कोंबले. नंतर गळ्याला धारदार चाकू लावून त्यांना धमकावले. त्यानंतर चोरट्यांनी बोंद्रना जबर मारहाण करून जखमी केले. चोरट्यांनी त्यांच्या दुकानातील सोने -चांदीचे दागिने मिळून तब्बल १२ लाख ४० हजाराचा ऐवज लंपास केला. या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिस उपायुक्त दीपक गिर्हे, छावणी विभागाचे सहाय्यक आयुक्त अशोक थोरात, गुन्हेशाखेचे सहाय्यक आयुक्त धनंजय पाटील, एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे निरीक्षक अविनाश आघाव, गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप गुरमे आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या लुटमारी प्रकरणी मंगलमूर्ती ज्वेलर्सचे मुकुंद बेंद्रे यांनी दिलेल्या तक्रारीवरून लुटमारी करणार्या तिघांविरूध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी दुकानातील आणि आजू-बाजूच्या परिसरातील सीसीटिव्ही कॅमेर्याचे फुटेज तपासासाठी ताब्यात घेतले आहे.