राहाता : कोपरगाव शहराच्या मध्यवर्ती अहिंसा चौक परिसरातील सचिन वॉच कंपनी या घड्याळाच्या दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी सुमारे ३३ लाख ६९ हजार रुपयांची महागडी घड्याळे व रोख रक्कम लंपास केली. ही घटना आज, शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली. कोपरगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोपरगाव शहरातील गुरुद्वारा रस्त्यावर संजय लालचंद जैन यांचे सचिन वॉच कंपनी हे दुकान असून चोरट्यांनी पहाटे, दुकानासमोर चादर आडवी लावत, शटर तोडून आत प्रवेश केला. दुकानातील २९ लाख २२ हजार रुपये किमतीची टायटन कंपनीची १५५ व टायमेक्स कंपनीची १२० घड्याळे अशी एकूण २७५ घड्याळे व ३ लाख ४७ हजार रुपये रोख रक्कम असा एकून ३३ लाख ६९ हजारांचा ऐवज चोरून नेला.

चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या चोरीत ६ पेक्षा जास्त चोरटे सहभागी असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे. संजय जैन यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी माजी आमदार स्नेहलता कोल्हे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे, नगरसेवक अतुल काले आदींनी भेट देत सखोल तपासाची मागणी केली.