केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना तृतीय पंथीय कवयित्री दिशा शेखने एक खुले पत्र लिहिले आहे. या पत्रात दिशा शेख यांनी गडकरींच्या त्या वक्तव्याचा निषेध केला जे तृतीयपंथीयांबाबत केले होते. हिजड्यांनी लग्न केले तर त्यांना मुलं होतील पण जलसिंचन प्रकल्प पूर्ण होणार नाही असे नितीन गडकरी म्हटले होते. त्यांच्या याच वक्तव्याचा निषेध करण्यासाठी पिंकी शेख यांनी गडकरींना खुले पत्र लिहिले आहे.
काय आहे हे पत्र?
महोदय,
जय भीम, जय भारत
सर्व प्रथम एक भारतीय नागरिक आणि मतदार म्हणून आपणास सांगू इच्छिते की, आपण भारतात राहतो आणि या देशाचं संविधान इथल्या प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने स्वतःच्या ओळखी सोबत जगण्याचा अधिकार देतं आणि हा सन्मान जर कुणी हिरावून घेत, एखाद्या व्यक्तीच्या अस्तित्वाचा उपहास करत असेल तर तो त्या व्यक्तीचा किंवा त्या समूहाचा नाही, तर या देशाच्या संविधानाचा उपहास आणि अनादर आहे आणि तुम्ही हा गुन्हा केला आहे. लोक प्रतिनिधी म्हणून सगळ्या समाजांचा आदर करण आणि त्यांना सामाजिक सन्मान बहाल करणं हे तुमचं कर्तव्य आहे.
जात, वर्ग, लिंग भेदावर आधारलेल्या इथल्या पितृसत्ताक शोषणाच्या बळी पडलेल्या आपल्या समाज व्यवस्थेला या शोषणातून वर काढणं लोकप्रतिनिधींची जवाबदारी आहे. त्याचसाठी लोकांनी तुम्हाला निवडून दिले आहे. हिजडा समाजाच्या अस्तित्वाचा त्यांच्यात असलेल्या मातृत्वाचा असल्या घाणेरड्या पद्धतीने उपहास म्हणून वापरणे तुम्हाला शोभले नाही. एखाद्या शारीरिक मानसिक अपंगत्व असलेल्या, सामाजिक स्थरात मागासलेल्या समुदायाचा असा उपहास म्हणून वापर करण त्या समूहाचा अपमान आहे .
खरंतर ह्या अपमानाच्या विरोधात तुमच्यावर हिजडा समूहाने मानहानीचा दावा करायला पाहिजे, पण ह्या देशात तुमच्या सारख्या नेत्यांमुळे स्वातंत्र्याच्या सत्तर पंचहात्तर वर्षानंतरही माझ्या समूहाच्या भुकेचे प्रश्न सुटलेले नाहीत. म्हणून माझ्या भगिनी तुमच्यासारख्यांकडून होणाऱ्या अपमानजनक वागणुकीलाही आपलं नशीब समजून भोगताना आणि सामाजिक अवहेलनेला सामोरे जातात पण मी शिव, शाहू ,फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्र्रातील ‘हिजडा’ आहे.
हो मी हिजडा आहे. त्यात अपमान वाटण्यासारखा काही नाही उलट हिजडा समाजाचा गौरवशाली इतिहास तुमच्यासारख्यानी इतिहासातून गायब केलाय, आणि त्याच इतिहासाची मी वारसदार आहे. म्हणून मी तुम्ही जो माझ्या हिजडा समूहाचा त्यांच्या लैगिकतेचा जो उपहास केला त्या कृत्याचा जाहीर निषेध करते,
#निषेध ! #निषेध! #निषेध!
तुम्हाला निषेधाची माझी प्रमाण संवैधानिक भाषा समजेल अशी मी आशा बाळगते, आणि अनावधाने तुम्हाला किंवा तुमच्या समर्थक कार्यकर्त्यांना माझं हे पत्र मिळालं तर त्यांनी ते तुम्हाला पोचवावं ही भोळी आशा बाळगते. हे पत्र तुम्हाला मिळाल्यावर तुम्ही माफी मागाल किंवा नाही हे तुमच्यावर झालेल्या संस्काराचे दर्शन असेल..
किमान परत कधी तुम्ही माझ्या आणि याच भारताच्या समाजाचा भाग असलेल्या हिजडा समुदायाचा आदर कराल अशी भाबडी आशा बाळगते
धन्यवाद..
आपली मतदार या नात्याने मालक
दिशा पिंकी शेख (मु.पो:- श्रीरामपूर, जिल्हा:- अहमदनगर, ता:-श्रीरामपूर)