पहाटेपासूनच सुरू झालेल्या पावसाच्या पाश्र्वभूमीवर येथे सिंहस्थातील तिसऱ्या व अंतिम पर्वणीस भाविकांचा फारसा प्रतिसाद मिळणार नसल्याचे सर्व अंदाज फोल ठरवीत लाखोंच्या संख्येने भाविकांनी शुक्रवारी रामकुंड परिसरात स्नान केले.
दुसऱ्या पर्वणीतील नियोजन प्रशासनाने शुक्रवारीही ‘जैसे थे’ ठेवले. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत पर्वणीसाठी देशभरातून रेल्वे व बस वाहतुकीव्दारे सुमारे पाच लाख भाविक शहरात दाखल झाले होते. पहाटे साडेतीनपासून शहरात पावसास सुरुवात झाली परंतु, पावसाची तमा न बाळगता भाविक मोठय़ा संख्येने रामकुंड परिसरात जमा झाले. निर्मोही व दिगंबर आखाडय़ाचे प्रमुख महंत नारोशंकर मंदिराजवळ थांबले असताना निर्वाणी आखाडय़ाच्या महंतांचे आगमन लांबल्याने उपस्थित दोन्ही आखाडय़ांच्या महंतांनी स्नानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. उपजिल्हाधिकारी महेश पाटील, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीनंतर निर्मोही व दिगंबर आखाडय़ाचे महंत शांत झाले. त्यानंतर महंतांनी शाहीस्नान केले. परतताना निर्वाणीनंतर दिगंबर, निर्मोही याप्रमाणे महंत मार्गस्थ झाले. दरम्यान, या पर्वणीत ४५५ जण बेपत्ता झाल्याची तक्रार होती. त्यापैकी ४५० जण सापडले. आता त्र्यंबकेश्वर येथील अंतिम पर्वणी २५ सप्टेंबर रोजी होणार आहे.

Story img Loader