रवींद्र केसकर
धाराशिव : थायलंडहून खास तुळजाभवानी देवीच्या चरणी अर्पण करण्यासाठी मागविण्यात आलेल्या ‘व्हाईट ऑर्चिड’, ‘अॅन्थुरियम’ फुलांनी तुळजाभवानी मंदिराचा परिसर झळाळून निघाला आहे. एक टन तीन क्विंटल फुलांच्या आकर्षक मांडणीमुळे जगदंबेचा दरबार सजला आहे. २८ कलाकारांनी सलग बारा तास काम करून तुळजाभवानी देवीचे महाद्वार, सिंहगाभारा, जिजाऊ महाद्वार आणि उपदेवतांची मंदिरे आकर्षक पध्दतीने सजवली आहेत. महाद्वारासमोरल फुलात साकारलेला गजलक्ष्मी रथ भाविकांच्या आकर्षणाचे प्रमुख केंद्र बनला आहे.
मागील १२ वर्षांपासून पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथील ज्ञानेश्वर पाचुंदकर तुळजाभवानी देवीच्या चरणी फुलांची आरास सेवेच्या माध्यमातून सादर करतात. तुळजाभवानी मंदिराप्रमाणेच विठ्ठल-रूक्मिणी मंदिर तुळजापूर, आळंदीचे संत ज्ञानेश्वर मंदिर, जेजुरीचा खंडोबा, कोल्हापुरची अंबाबाई आणि रांजणगावच्या महागणपतीलाही दरवर्षी पाचुंदकर फुलांची आरास करतात. तुळजाभवानी देवी मंदिरात फुलांची सजावट करण्याचे त्यांचे हे बारावे वर्ष आहे.
आणखी वाचा-सांगली : नोकऱ्यांचे कंत्राटीकरण विरोधात उंटासह मोर्चा
पुणे येथील कुमार शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांनी १४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता फुलांची सजावट करण्यास सुरूवात केली. महाद्वार आणि जिजाऊ द्वाराचे तोरण, यज्ञमंंडपाला आकर्षक पध्दतीने बांधण्यात आलेले फुलतोरण, त्याचबरोबर मंदिराच्या परिसरात असलेल्या उपदेवतांची सजावट, दगडी देवळ्यांना फुलांची माळांनी दिलेले अनोखे रूप, चांदी दरवाजा, सिंह दरवाजा, मुख्य गाभारा आणि पिंपळ पारावर केलेली लक्षवेधी सजावट येणार्या प्रत्येक भाविकाचे लक्ष वेधत आहे.
या फुलांचा करण्यात आला वापर
थायलंड येथून व्हाईट ऑर्चिड फुलांचे दहा बंच आणि अॅन्थुरियमचे ५०० बंच मागविण्यात आले. या प्रत्येक बंचची किंमत एक हजार रूपये आहे. त्याव्यतिरिक्त शेवंती, झेंडू, अश्टर, जरबेरा, गुलाब, ग्लॅडिओस, जिप्सो आणि अशोकाचा पाला अशा एक हजार ३०० किलो सुट्या फुलांचा या सजावटीसाठी वापर करण्यात आला असल्याची माहिती कुमार शिंदे यांनी दिली.
आई वडिलांच्या श्रद्धेपोटी जगदंबेची सेवा
आई-वडिलांच्या श्रध्देपोटी कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीची आपण सेवा करीत असल्याची माहिती ज्ञानेश्वर पाचुंदकर यांनी दिली. पुणे येथे मोठे उद्योजक असलेल्या पाचुंदकरांच्या केमिकल आणि फार्मा कंपन्या आहेत. त्याचबरोबर ८०० खासगी बसचे ते मालक आहेत. दरवर्षी पंढरपूर, आळंदी, जेजुरी, कोल्हापूर, रांजणगाव आणि तुळजापूर तीर्थक्षेत्री फुलांची आरास मांडण्याकरिता ३० ते ३५ लाख रूपयांचा खर्च मोठ्या आनंदाने करीत असल्याचे त्यांनी सांगितले.