जेसीबीच्या चाकाखाली आल्यामुळे एक शाळकरी मुलगा ठार झाल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमधील वाघवाडी ते इस्लामपूर रस्त्यावर घडली. रस्त्याच्या शेजारी झोपल्यामुळे हा अपघात घडला असून सुरुवातीला या घटनेबाबत घातपात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. मात्र इस्लामपूर पोलिसांनी तातडीने तपास करत जेसीबी चालकाच्या चुकीमुळे ही घटना घडल्याचा निष्कर्ष काढत चालकाला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सांगलीच्या इस्लामपूर या ठिकाणी असणाऱ्या वाघवाडी ते इस्लामपूर रस्त्यावर अभियंता नगरमध्ये कृषी महाविद्यालयाच्या कुंपणाचे काम सुरू आहे. तेथे भिंतीलगत काही लोक गेली अनेक वर्षे दगड घडवण्याचे काम करत असतात. दगडकाम करणाऱ्यांमधील तिघेजण रात्री रस्त्यावर झोपले होते. त्यापैकीच एका मुलाचा झोपलेल्या स्थितीमध्ये असताना मृतदेह आढळला.
धक्कादायक बाब म्हणजे या अपघातात मृत मुलाचे डोके फुटले. मात्र या मुलाच्या डोक्याची कवटी घटनास्थळाहून गायब असल्याची बाब पोलिसांच्या निदर्शनास आली. तसेच मृत मुलाच्या आजूबाजूला झोपणारी दोघेजण मात्र सुरक्षित आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही. त्यामुळे या घटनेबाबत उलट-सुलट चर्चा सुरू होती. या घटनेची माहिती मिळताच इस्लामपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत तपास सुरू केला.
या घटनेबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले की, “सदरच्या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्याशेजारी तीन मुले झोपली होती. त्यामधील एकाचा मृत्यू झाला आहे. जेसीबीच्या चाकाखाली डोकं आल्याने ही घटना घडली आहे. याप्रकरणी या रस्त्याच्या ठिकाणी काम करणाऱ्या एका जेसीबी चालकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदरच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. जेसीबी मागे घेत असताना हा अपघात घडला आणि यानंतर चालक घाबरून पळून गेला होता,” असे पोलिसांनी सांगितले.