गेल्या काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर नाराज असल्याची चर्चा आहे. रविकांत तुपकर यांनी नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवर आणि भूमिकेबद्दल आक्षेप घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिस्तपालन समितीची आज ( ८ ऑगस्ट ) पुण्यात बैठक बोलवण्यात आली आहे. पण, या बैठकीला न जाण्याचा निर्णय रविकांत तुपकर यांनी घेतला आहे.
“मी वारंवार या गोष्टी अवगत केल्या आहेत. मी बैठकीला जाणार नाही. मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतच राहूनच काम करणार आहे. माझी नाराजी आणि आक्षेप राजू शेट्टी यांच्या कानावर वारंवार घातली आहे,” असं रविकांत तुपकर यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : रविकांत तुपकरांच्या पाठीमागे भाजपाचा हात? स्वाभिमानी हायजॅक करण्याचा प्रयत्न? राजू शेट्टी ठणकावून म्हणाले…
यावर ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी म्हणाले, “आजची बैठक रविकांत तुपकर यांनी उपस्थित केलेल्या तक्रारीबद्दल बोलावण्यात आली आहे. तुपकरांनी संघटनेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याकडे किंवा माझ्याकडे नाराजी व्यक्त केली नाही. मी माध्यमाच्याद्वारे सर्व ऐकत आहे. बैठकीत येऊन तुपकर यांनी आपलं मत मांडायला हवं. माझ्या कार्यपद्धतीबद्दल आक्षेप असतील तर, मी समितीच्या बैठकीत असताना किंवा नसताना भूमिका मांडता येते.”
त्यावर रविकांत तुपकर यांनी म्हटलं, “मी ४-५ वर्षापासून हे सर्व विषय राजू शेट्टी यांच्याकडे मांडले आहेत. शिस्तपालन समितीचे अध्यक्ष प्राध्यापक पोकळे यांच्याकडेही माझे मत मांडलं आहे. सोमवारी ( ७ जुलै ) माझे मत पुन्हा एकदा प्राध्यापक पोकळे यांच्याकडं मांडलं आणि समितीच्या बैठकीला येऊ शकत नाही, असं सांगितलं.”
यावर राजू शेट्टी यांनी सांगितलं, “संघटनेच्या अंतर्गत समिती आहे. त्या समितीच्या समोर येणार नाही, हा अहंकार बरोबर नाही. मी स्वत: समितीच्या समोर येण्यास तयार आहे. माझ्याबद्दल आक्षेप असतील, तर मी समितीच्या बैठकीला येणार नाही, असेही सांगितलं.”
हेही वाचा : स्वाभिमानीवर दावा करणार का? भाजपात जाणार का? राजू शेट्टींना लक्ष्य करत रविकांत तुपकर म्हणाले…
यावर रविकांत तुपकर म्हणाले, “मी अजिबात अहंकारी माणूस नाही आहे. मी जमिनीवर काम करणारा कार्यकर्ता आहे. अशा बैठका अनेकदा झाल्या आहेत. समितीच्या सदस्यांकडे अनेकदा माझे मत मांडलं आहे. माझ्या मताची दखल घेतली असती, तर पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोललो नसतो. बैठकीला आलो नाही, म्हणजे अहंकारी आहे, असं होत नाही.”