समाजाच्या सुरक्षेसाठी पोलीस दल निर्माण करण्यात आले आहे. पण गावपातळीवरील लोकांमध्ये अजूनही काही प्रमाणात पोलिसांबाबत भितीचे वातावरण आहे. ही भिती दूर करून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्राच्या भंडारा जिल्ह्यातील तैनात महिला आयपीएस अधिकाऱ्याने एक अनोखी मोहिम सुरू केली आहे. लोकांच्या मनातील भिती काढून टाकण्यासाठी पोलीस ठाणेच चक्क दुर्गम गावांमध्ये घेवून जाण्याची किमया या महिला अधिकाऱ्याने केली आहे.
भंडारा जल्ह्यात तैनात असलेल्या या कार्यक्षम महिला आयपीएस अधिकाऱ्यांचे नाव विनीता साहू असे आहे. २०१७ पासून त्या गावपातळीवर अस्थाई स्वरूपात पोलीस ठाणे सुरू करतात. ग्रामीण भागातील नागरिकांनी पोलीसांशी संपर्क साधावा यासाठी गावकऱ्यांना विविध पद्धतीने प्रोत्साहन दिले जाते. गेल्या दोन वर्षात त्यांनी राबविलेल्या या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळला आहे. ‘जग आज वेगाने पुढे जात आहे. प्रत्येक गोष्ट लोकांना घरबसल्या मिळत आहे. कोणतीही सेवा तातडीने उपलब्ध होत आहे. अशा स्थितीत देशातील कायदेव्यवस्थेचा सर्वात महत्वाचा भाग असलेल्या पोलीस दलाची सेवा देखील नागरिकांना प्रत्येक वेळी वेगाने उपलब्ध झाली पाहिजे, असे मत साहू यांनी एका सोशल आॅडिट अहवालात व्यक्त केले आहे.’
विशेष म्हणजे प्रत्येक पोलीस ठाण्यावर महिला कॉन्सटेबलही हजर असते. ‘द बेटर इंडिया’च्या अहवालानूसार विनीता साहू यांनी जानेवारी २०१७ मध्ये ही अनोखी मोहिम सुरू केली होती. मोहिब राबविण्यासाठी त्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांची देखील मदत घेतली. मोबाइल पोलीस स्टेशन प्रमाणे ग्रामीण भागात लोकांच्या तक्रारी नोंदवून घेण्यासाठी अस्थाई स्वरूपातील पोलीस ठाणे सुरू केले जाते. अशा ठाण्यात एक पोलीस अधिकारी व एका महिला कॉन्सटेबलसह तीन जण नियुक्त असतात. ज्याठिकाणी सुविधा नाहीत अशा ठिकाणी तर चक्क तंबू ठोकून पोलीस सुविधा पोहचविण्याचे काम साहू यांनी करून दाखविले आहे. प्रत्येक शनिवारी १८ ठिकाणांवर लावल्या जाणाऱ्या अशा पोलीस सेवेचा जवळपास १.५ लाख लोकांना फायदा मिळला आहे.