मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण प्रकरणात खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दाम्पत्याविरोधात सत्र न्यायालायत सुनावणी सुरू आहे. मागच्या सुनावणीवेळी राणा दाम्पत्य गैरहजर होते. तर, आजही सुनावणीला पोहोचण्यास राणांना उशीर झाल्याने सत्र न्यायालायने त्यांना झापलं आहे. दरम्यान, ही सर्व उद्धव ठाकरेंची देण आहे, अशा कठोर शब्दांत नवनीत राणा यांनी ठाकरेंवर टीका केली आहे. कोर्टातील सुनावणी संपवून बाहेर आल्यानंतर नवनीत राणा यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
“प्रत्येकवेळी कोर्टात यावं लागतं, हजेरी द्यायला लागते, ऐकावं लागतं. ही उद्धवसाहेबांची ही देण आहे. हनुमान चालिसा वाचेन म्हटलं होतं तर या सर्व गोष्टी सुरू आहेत आजही. कधी डोंबिवली, बोरिवलीला बोलवतात. अनेक केसेस सुरू आहेत. तर कधी वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात जावं लागतं. एक महिला म्हणून खूप वाईट वाटतंय. आज रवी राणांना बरं नाही म्हणून मला यावं लागलं. पण मनाला खूप वाईट वाटण्यासारखं आहे. परंतु, कोर्टाचे आदेश मान्य असतात”, असं नवनीत राणा म्हणाल्या.
मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण प्रकरणात खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना अटक झाली होती. त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्यामुळे राणा दाम्पत्याने उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. दरम्यान, याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे. सुनावणीच्या वेळी राणा दाम्पत्य गैरहजर राहत असल्याने न्यायालायने त्यांना सुनावलं होतं. तसंच, न्यायाधीश राहुल रोकडे यांनी कठोर शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. गैरहजेरीमुळे राणांच्या वकिलांना लेखी हमी द्यावी लागली होती. हमी दिली नसतील तर कोर्टकडून वॉरंट बजावण्यात येणार होतं. या वॉरंटची नामुष्की टाळण्याकरता नवनीत राणा आज न्यायालयात हजर राहिल्या.