भाजपा आमदार नितेश राणे यांना काल(बुधवार) जामीन मंजूर झाला आणि त्यांनतर आज सकाळी त्यांना कोल्हापुरातील रुग्णालयातून डिस्चार्जही दिला गेला. यानंतर ते आज दुपारी सावंतवाडीत पोहचले असताना त्यांच्याशी माध्यम प्रतिनिधींनी संवाद साधला. “मला संरक्षण असताना देखील स्वत: सरेंडर झालो, मला अटक केलेली नाही. हे सरकार मला अजुनपर्यंत अटक करू शकलेलं नाही. मी स्वत: सरेंडर झालो. असंही यावेळी नितेश राणे यांनी बोलून दाखवलं.”
संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश राणेंना सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर
नितेश राणे म्हणाले, “पहिल्या दिवसापासुन म्हणजे १८ डिसेंबर ज्या दिवशी ही घटना झाली, ते आजपर्यंत मी पहिल्या दिवसापासूनच पोलिसांना, संबंधित अधिकाऱ्यांना जी मदत, माहिती हवी होती. सगळ्या तपासकार्यात मी सतात्याने मदत करत होतो आणि तशीच मदत या पुढेही जिथे जिथे पोलीस खात्याला तपास कार्यात माझी मदत लागेल. मला न्यायालायने ज्या अटी शर्थी लावून दिलेल्या आहेत. त्या सगळ्या अटी शर्थींचं पालन करून आणि चौकशी अधिकरी जेव्हा जेव्हा मला बोलावतील, तेव्हा तेव्हा त्यांच्याकडे जाऊन हजेरी लावून त्या सगळ्या तपास कार्यात मदत मी कालही केली होती, आजही करणार आणि पुढेही करणार आहे.“मी कुठल्याही तपास कार्यातून लांब गेलेलो नव्हतो. मला जेव्हा जेव्हा फोन आले, जेव्हा जेव्हा माझ्याशी संपर्क केला गेला. तेव्हा तेव्हा मी त्यांच्याकडे गेलो होतो, जात होतो, बोलत होतो तेव्हा माध्यमांनी देखील ते दाखवलं आहे. कुठ्ल्याही तपासकार्यात मी कधी अडथळे आणले नाहीत, कुठली माहिती लपवली नाही. मला जी नोटीस मिळाली, जे काही प्रश्न विचारले ती सगळी माहिती जेवढी माझ्याकडे होती ती सर्व माहिती मी देत होतो. यापुढेही मी देणार आहे.”
मला संरक्षण असताना देखील स्वत: सरेंडर झालो –
तसेच, “एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मी विधीमंडळाचा एक सदस्य आहे. दोन वेळा निवडून आलेला एक लोकप्रतिनिधी आहे. जवाबदारीने वागणं, हे माझ्याकडून अपेक्षित असतं. म्हणून त्यानुसार मला जेव्हा जेव्हा कोणीही माझा मतदार किंवा या तपासकार्यात असो, माझं सहकार्य मागतात किंवा मागत होते, तेव्हा एक जवाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यांना सहकार्य करत होतो. पळण्याचा कुठलाही विषय कधी आला नाही. मला पोलिसांनी अटक करण्याची पण गरज भासली नाही, ज्या दिवशी मी सरेंडर झालो. आपणास माहिती असेल की आणखी चार दिवस मला सर्वोच्च न्यायालयाचं संरक्षण होतं. पण तरीही त्या एक दिवसाअगोदर जे काही न्यायालयाच्या बाहेर घडलं. ज्या पद्धतीने माझी गाडी अडवली गेली आणि त्यानंतर माझ्या कार्यकर्त्यांना माझ्या सहकाऱ्यांना केसेसमध्ये अडकवण्याचा जो काही प्रयत्न सुरू झाला. त्याचबरोबर मी हा देखील विचार केला, की सिंधुदुर्गच्या जनतेला माझ्यामुळे कुठला त्रास नको. कायदा आणि सुव्यवस्था कुठेही खराब माझ्यामुळे व्हायला नको. म्हणून मी माझ्या कुटुंबाशी चर्चा करून, माझ्या वकिलांशी चर्चा करून मी स्वत: सरेंडर झालो. मला संरक्षण असताना देखील स्वत: सरेंडर झालो, मला अटक केलेली नाही. हे सरकार मला अजुनपर्यंत अटक करू शकलेलं नाही. मी स्वत: सरेंडर झालो आणि त्यानंतर मला दोनच दिवसांची पीसी दिली गेली आणि मी एमसीआर मध्ये होतो.” असंही नितेश राणे यांनी यावेळी सांगितलं.
महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला हे साजेसे आहे का? –
याचबरोबर “ त्यानंतर माझ्या तब्यतेबद्दल जे काही विषय सुरू होते. मला आश्चर्य असं वाटतं, की मला जो काही आधी त्रास होतोय याच्याही नंतर मी कोल्हापुरच्या रुग्णालयातून सुट्टी घेतली असली तरी, यानंतर मी माझ्या वैद्यकीय रुग्णालयात जाणार आहे, तिथे मी दोन दिवस रुग्णालयात दाखल होणार आहे, त्यानंतर काही उपचारांसाठी मी मुंबईला जाणार आहे. मला पाठीचा, मणक्याचा त्रास अगोदरही होता. एमआरआय रिपोर्ट देखील डॉक्टरांनी बघितले आणि आता तो वाढलेला आहे. रक्तदाबाचा त्रास आहे, माझी शुगर लो होते आहे. आता हा सगळा जो काही विषय आहे, जे माझ्यावर आरोप होत होते की, हे राजकीय आजार आहे. न्यायलयीन कोठडी होती म्हणून याने राजकीय आजार काढले आहेत. चला आपण एक मानू की नितेश राणे खोटं बोलतोय, त्याला तुरुंगात जायचं नाही. पण माझी जी वैद्यकीय तपासणी व्हायची, जे काय माझे रिपोर्ट काढले होते ते देखील काही खोटे होते का? कोणाच्याही तब्यतीबाबत अशाप्रकारे प्रश्न उपस्थित करणे, हे किती नैतिकतेमध्ये बसतं, महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला हे साजेसे आहे का? हा विचारही थोडा आपण करायला हवा.” असंही नितेश राणे यांनी बोलून दाखवलं.
तेव्हाच मुख्यमंत्री गळ्यात बेल्ट का घालतात, असं आम्ही विचारलं तर चालेल का? –
तर, “मग प्रश्न विचारायचे असतील तर आम्ही देखील खूप विचारू शकतो. आम्ही देखील हे विचारलं तर चालेल का? की जेव्हा सरकार पडण्याची वेळ येते, जेव्हा ईडीच्या कारवाया सुरू होतात, तेव्हाच मुख्यमंत्री गळ्यात बेल्ट का घालतात. असं आम्ही विचारलं तर चालेल का? लता दीदींच्या अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमास मुख्यमंत्री स्वत: गेले होते असं मी ऐकलं. तिथे बेल्ट वैगेरे काहीच नव्हतं घातलेलं. मग अधिवेशनाच्या काळात नेमकं त्याचवेळी मुख्यमंत्री आजारी का पडतात? महाविकास आघाडीची जी नेतेमंडळी आहेत, त्यांच्यावर जेव्हा ईडीच्या कारवाई सुरू होतात तेव्हाच त्यांच्यासोबत १४ दिवस करोना त्यांना कसा होतो? हे प्रश्न आम्ही विचारले तर चालतील का? कोणाच्या तब्यतेबद्दल, आरोग्य व्यवस्थेवर असा प्रश्न निर्माण करणं, हे नैतिकतेच्या चौकटीत बसतं का? याबद्दल सगळ्यांनी विचार करायला हवां, असं माझं तरी मत आहे.” असं म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.