मराठवाडा मुक्ती संग्रामच्या निमित्ताने संभाजी नगर येथे उद्या मंत्रिमंडळ बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या मंत्रिमंडळ बैठकीसाठी संपूर्ण मंत्रिमंडळ उद्या संभाजीनगरला येतील. त्यांच्या राहण्याची सोय येथील हॉटेल्समध्ये करण्यात आली आहे. तर, विश्रामगृहेही बुक करण्यात आले आहे. यावरून ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मंत्रिमंडळ बैठकीसाठी इतका थाट कशाकरता? असा सवाल संजय राऊतांना विचारण्यात आता. त्यावर संजय राऊत म्हणाले की, “या सरकारचं आम्ही अंत्यसंस्कार थाटामाटतच करणार आहोत. हे त्यातच जाणार आहेत. तीन तासांसाठी संपूर्ण प्रशासन वेठीस धरता. हा सगळा खर्च तुम्ही दुष्काळग्रस्तांवर खर्च करा. येथे प्यायला पाणी नाही, अनेक प्रश्न आहेत.”

हेही वाचा >> “कुठे गेल्या गायी-म्हशी? गोमांसभक्षक संघ कार्यकर्त्यांकडे…”, संजय राऊतांचं सरकारवर टीकास्र

आमचं लक्ष मंत्रिमंडळ बैठकीकडे आहे. बैठकीनंतर होणाऱ्या पोपटपंचीकडे जास्त लक्ष आहे, असंही संजय राऊत म्हणाले. दरम्यान, मराठवाडा मुक्तीसंग्रामच्या बॅनर्सवरूनही संजय राऊतानी सरकारला फटकारलं आहे. स्वामी रामानंद तिर्थ, गोविंदभाई श्रॉफ, शंकरराव चव्हाण आदी नेते या संग्रामात होते. त्यांचे या बॅनरवर फोटो नाहीत. मग हे नेते स्वातंत्र्य संग्रामात नव्हते तर काय मोदी, शाह आणि रावसाहेब दानवे संग्रामात होते का? असा सवालही राऊतांनी विचारला.

बैठकीसाठी कोण अधिकारी येणार?

“संभाजी नगरचे सर्व हॉटेल्स बंद आहेत. कोणासाठी, कोण येतंय इथं? किती मंत्री आणि अधिकारी येणार आहेत. जत्रा कोणाची येतेय इथं? जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व हॉटेल्स बुक केल्याचं मला कळलं. कोण करतंय खर्च, बेकायदेशीर सरकारकडून खर्च होतोय. या गोष्टींचा विचार करायला लागेल, असं संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा >> “जवान अतिरेक्यांशी प्राणपणाने लढत असताना…”, पंतप्रधानांच्या ‘त्या’ कृतीवर ठाकरे गटाकडून हल्लाबोल

“या कार्यक्रमाला अमित शाह येणार नाहीत. येथे न येण्याचा त्यांनी शहाणपणाचा निर्णय घेतला आहे. पण आमचा भ्रमनिरास झाला, आम्हाला त्यांचं जोरदार स्वागत करायचं होतं. त्यांच्या स्वागताची योजना, कल्पना तयारी मागे पडली”, असंही संजय राऊत म्हणाले.

सरकार डरपोक

डरपोक आणि बेकायदा सरकार असून प्रत्येक संकटातून सरकार पळून जातंय. देशाची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. काश्मीरमध्ये कर्नल, मेजर डीएसपी शहीद झाले. चार जवान लष्करी अधिकारी एकाच वेळेला शहीद होतात. सारा देश दुःखसागरात बुडाला हे ऐकून. आणि आमचे पंतप्रधान तिथे दिल्लीमध्ये पक्षाच्या कार्यालयात स्वतःवर फुलं उधळून घेतली, अशी टीका राऊतांनी केली.

मला आठवतंय दिल्लीत बॉम्ब स्फोट झाले. खान मार्केटमध्ये बॉम्ब स्फोट झाला होता. तेव्हा शिवराज पाटील गेले होते. नंतर फक्त त्यांनी शर्ट बदलला. फक्त शर्ट बदलला म्हणून गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. काल तिकडे चार जवांनांनी हौतात्म्य पत्कारलं आणि आमचे पंतप्रधान आणि भाजपा दिल्लीतील मुख्यालयात उत्सव साजरा करत होते. स्वतःवर फुलं उधळून घेतली. हा त्यांचा सनातन धर्म आहे. हा आमचा सनातन धर्म नाही. हा त्यांचा भारत वेगळा आहे, तो आमचा भारत नाही. जे जवान शहीद झाले ते भारताचे सुपूत्र होते. नुसतं इंडियाचं भारत केलं की प्रश्न सुटणार नाही. राजकीय कारणासाठी हे ढोंग बंद केलं पाहिजे. चार जवानांचं हौतात्म्य हा सनातन धर्माचा भाग होता आणि तुम्ही फुलं उधळून घेताय. हे प्रश्न आम्हाला उद्या विचारायचे आहेत. कारण देशाची अंतर्गत सुरक्षा, बाह्य सुरक्षा ही राजनाथ सिंहांची जबाबदरी आहे. आणि ते भाजपा कार्यालयात हजर होते. देश कोणत्या दिशेने चाललाय”, असंही संजय राऊत म्हणाले.

“महाराष्ट्रात काही वेगळं चाललं नाहीय. ज्या बेकायदेशीर सरकारचा निकाल चाळीस तास निकाल लागायला पाहिजे होता. पण बेकायदेशीर सरकार राज्यात निर्णय घेतंय. महाराष्ट्राची प्रतिष्ठा पणाला लावतंय, सर्वोच्च न्यायालयाने मे महिन्यात निकाल दिला की हे सरकार बेकायदेशीर आहे. एकनाथ शिंदेंची निवड बेकायदेशीर आहे, गोगावलेंची प्रतोद निवड बेकायदेशीर आहे. त्यामुळे सरकार बेकायदशीर आहे. पण विधानसभेचे अध्यक्ष गेल्या सहा महिन्यांपासून सुनावणी घेण्यास तयार नाही, आणि काल सुनावणी घेतली त्यालाही पुढील तारीख दिली. हे बेकायदेशीर सरकार उद्या मराठवाड्यात येणार आहे. मला असं वाटतं की या सरकारला कोणत्याही प्रकारचे निर्णय घेण्याचा अधिकार नाही. त्यांचे निर्णय बेकायदेशीर ठरणार आहेत. शासन आपल्या दारीचे कार्यक्रम कोट्यवधीचे कंत्राट दिले जात आहेत. हे त्यांचं रॅकेट आहे. सरकारी कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी यांना बोलावलं जातंय. हे कुठेतरी थांबयाल हवं. यासाठी आम्ही कालपासून येथे आहोत”, असंही ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This government will be cremated with pomp sanjay rauts statement said for three hours sgk