शिवसेनेचे ‘धनुष्य-बाण’ हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा हंगामी आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी रात्री उशिरा जारी केला. या आदेशामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांना अंधेरी-पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या चिन्हाचा वापर करता येणार नाही. आयोगाचा हा निर्णय ठाकरे गटासाठी धक्कादायक असून त्याविरोधात न्यायालयात दाद मागितली जाण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. कालपासून विविध नेत्यांच्या प्रतिक्रियाही समोर येत आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष यांनीही प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख यांच्यामुळेच शिवसेनेची आज ही परिस्थिती झाली आहे. उद्धव ठाकरेंची परिस्थिती ‘हम दो हमारे दो’ अशी होणार आहे. असंही म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नक्की वाचा : निवडणूक आयोगाने शिवसेनेचं चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “आज त्यांचे जे १२ खासदार बाहेर पडले आहेत, त्यांना माहीत आहे की आम्ही मोदींच्या विश्वासावर आम्ही निवडून आलो आहोत आणि त्यांच्याकडे जे बाकी आहेत, त्यांनाही हे माहीत आहे. त्यामुळे ते आता जाणीवपूर्वक त्यांची गेलेली पत परत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. आता ही फार मोठी त्सुनामी आलेली आहे आणि ही सुनामी पूर्णपणे उध्वस्त करून गेली आहे. हेकेखोरपणा, हट्टीपणा, बोललं ते जागणं नाही. विचाराविरुद्ध कुठेही जाऊन युती करणे. हे तर खरं आहे की मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी आणि परिवारातील सदस्यांना पदं मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण शिवसेनेची वाट लावली. मला वाटतं ती त्यांच्या जीवानातली सर्वात मोठी चूक होती. यानंतर आता ही चूक दुरूस्त करणे कठीण आहे. त्यांच्या हातून आता सगळं काही निसटत चाललं आहे.”

हेही वाचा : शिवसेनेच्या चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयावर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

याचबरोबर “शिवसेनेची आज जी परिस्थिती झाली ती केवळ उद्धव ठाकरेंच्या चुकीच्या वागण्यामुळे झाली आहे आणि त्यांना कोणी ढकलेलं नाही, ते स्वत:च पळून गेले आहेत. आम्ही तर त्यांचे दरवाजे कितीदा ठोकले, दरवाजे उघडायलाच तयार नव्हते. त्यामुळे मला वाटतं त्यांनी आता पुन्हा एकदा चिंतन करण्याची गरज आहे. पण ते आत्मचिंतन करत नाहीत. एवढे ४० आमदार, १२ खासदार सोडून गेले तरी देखील तरी आत्मचिंतन होत नाही. अजुनही हेकेखोरपणा सुरूच आहे. अजुनही दसरा मेळाव्याचं भाषण आवेशात सुरूच आहे. उद्या दोन राहिले तरी ते सुरू राहणार आहे आणि मग हम दो हमारे दो ही परिस्थिती उद्धव ठाकरेंची होणार आहे.” असंही बावनकळे यांनी यावेळी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This is a very big tsunami uddhav thackerays situation will be hum do hamare do chandrasekhar bawankule msr