विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाच्या सज्जतेसाठी गुरुवारी शहरात दाखल झालेले काँग्रेस नेते खासदार अशोक चव्हाण यांना शुक्रवारी सकाळी निवडणूक आयोगापुढील कायदेशीर लढाईत दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला. याच वेळी जिल्ह्य़ातील काँग्रेस आघाडीचे अन्य सात आमदार व राष्ट्रवादीचे बापूसाहेब गोरठेकर यांच्यावरील गंडांतर तूर्त टळले. न्यायालयाच्या निकालावर समाधान व्यक्त करताना ‘हा माझा नव्हे, तर काँग्रेस पक्षाचा विजय आहे’ असे मत अशोक चव्हाण यांनी येथे व्यक्त केले. दरम्यान, हा निकाल कळल्यानंतर चव्हाण, आमदार अमरनाथ राजूरकर तसेच काँग्रेसमधील त्यांच्या समर्थकांची अस्वस्थता, दडपण, तणाव दूर झाला.
केंद्रीय निवडणूक आयोगासमोरील डॉ. माधव किन्हाळकर विरुद्ध अशोक चव्हाण यांच्यातील कायदेशीर लढाईत आयोगाने १३ जुलै रोजी चव्हाण यांच्यावर निवडणूक नियमातील कलम ८९ (५) अन्वये नोटीस बजावली होती. त्यावर त्यांना २० दिवसांत उत्तर द्यावयाचे होते; पण चव्हाण यांनी दिल्ली उच्च न्यायालयात या नोटिशीलाच आव्हान दिले. त्यावर गेल्या महिन्यात सुनावणी झाल्यानंतर सर्वानाच निकालाची प्रतीक्षा होती. न्यायमूर्ती सुरेश कैथ शुक्रवारी निकाल देणार असल्याचे गुरुवारी सायंकाळी स्पष्ट झाल्याने चव्हाण, तसेच डॉ. किन्हाळकर यांचे निकालाकडे लक्ष लागले होते. या प्रकरणात त्यांनी केलेल्या विनंतीवरून न्यायालयाने आयोगाची वरील नोटीस रद्दबातल ठरविल्याने आयोगासमोरील प्रकरण संपुष्टात आल्याचे मानले जाते. तथापि उच्च न्यायालयाने प्रतिवादींनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय खुला ठेवला.
 याच प्रकरणाच्या संदर्भाने जिल्ह्य़ातील काँग्रेस आघाडीतील वसंतराव चव्हाण वगळता अन्य सात आमदार तसेच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर यांच्या राजकीय भवितव्यावर संकटाचे ढग जमा झाले होते. निवडणूक खर्चप्रकरणी २००९ च्या विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांना दोषी ठरविण्याची कृती, तसेच त्यानुसार आयोगाकडून त्यांच्यावर बजावलेली नोटीस उच्च न्यायालयाने ग्राह्य़ (वैध) ठरवली असती, तर त्या निवडणुकीतील काँग्रेस आघाडीचे अन्य आठ उमेदवार (ज्यात सात विद्यमान आमदार) अडचणीत येऊ शकत होते. त्यांच्या विरोधातील तक्रार व त्या बाबत जिल्हा प्रशासनाने शोधलेली पळवाट यावर माध्यमांतून राळ उठल्यामुळे गेल्या काही दिवसात हे सर्व ‘चर्चेतले चेहरे’ होते; पण आता त्यांच्यावरील गंडांतर तूर्त टळले आहे.
हा तर काँग्रेसचा विजय- चव्हाण
न्यायालयाच्या निकालावर समाधान व्यक्त करताना ‘हा माझा नव्हे, तर काँग्रेस पक्षाचा विजय आहे’ असे मत अशोक चव्हाण यांनी येथे व्यक्त केले. दिल्ली उच्च न्यायालयासमोर चव्हाण यांची बाजू काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी कायदामंत्री अॅड. कपिल सिब्बल यांनी मांडली. न्यायालयाने आधी या प्रकरणास स्थगिती दिली; पण प्रतिवादी डॉ. किन्हाळकर यांनी त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर या न्यायालयाने चव्हाणांची याचिका १५ दिवसांत निकाली काढा, असा आदेश दिला होता. त्यानुसार उच्च न्यायालयाने निकाल दिला. चव्हाण यांनी त्यावर समाधान व्यक्त  केले, तर दुसरीकडे डॉ. किन्हाळकर यांनी निकालपत्राचा अभ्यास केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे स्पष्ट केले.