लोकसत्ता प्रतिनिधी
सांगली : जो जो तिरंग्याला सलाम करेल, राष्ट्रगीत म्हणेल, त्या हिंदूंचे रक्षण करण्याचे आमचे काम आहे. हे हिंदूंचे राष्ट्र आहे, त्यामुळे या ठिकाणी सर्वांत प्रथम हिंदूंचे हितच पाहिले जाईल, असे प्रतिपादन मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नीतेश राणे यांनी शुक्रवारी सांगलीत केले. विशाळगडावर उरूस भरवण्यासही त्यांनी विरोध केला असून, असा प्रकार झाल्यास तो हाणून पाडला जाईल, असेही राणे म्हणाले.
सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या हिंदू गर्जना सभेत राणे बोलत होते. या वेळी आ. सुरेश खाडे, सत्यजित देशमुख, भाजपच्या नेत्या नीता केळकर, शेखर इनामदार, माजी आमदार नितीन शिंदे आदी उपस्थित होते.
आणखी वाचा-उदयनराजेंसह वारसांना जमीन महसूल सूट कायम, राज्य शासनाचा निर्णय
राणे म्हणाले, की हे हिंदूंचे राष्ट्र असून, या ठिकाणी हिंदू हितच सर्वप्रथम पाहिले जाईल. ‘भाईचारा’सारखी वक्तव्ये पाकिस्तानात जाऊन करावीत. आजही अनेक ठिकाणी पूजा, आरती करण्यासाठी आपल्याला दोन वेळा विचार करावा लागत असेल, तर आपण हिंदू राष्ट्रात राहतो का, असा प्रश्न पडतो. ‘सेक्युलर’ शब्दाची काँग्रेसने घाण केली आहे. हिंदू म्हणून आपली भूमिका आणि विचार स्पष्ट असलेच पाहिजेत. मी हिंदूंच्या मतावरच आमदार झालेलो आहे. मी मत मागण्यासाठी मुस्लीम मोहल्ल्यात गेलोच नाही.
विरोधक ‘ईव्हीएम’ला दोष देतात. पण आम्ही तिकडे ‘ईव्हीएम’वरच निवडून आलो. हे आमचे ‘ईव्हीएम’ म्हणजे ‘एव्हरी व्होट्स अगेन्स्ट मोहल्ला.’ ज्याने भगवाधारी सरकार आणले, त्याचे संरक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे. राज्यात आता हिंदुत्ववादी सरकार आहे. विशाळगडावर १२ तारखेला कसा उरूस होतो हे आम्हाला पाहायचे आहे, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.
या वेळी आ. सुरेश खाडे म्हणाले, की ‘बटेंगे तो कटेंगे’ या नाऱ्यामुळे विधानसभा निवडणुकीवेळी सर्व हिंदू एकत्र आला. आम्ही दलित असलो, तरी हिंदू आहोत. हे हिंदू राष्ट्र होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. मी मिनी पाकिस्तानमधून लढून चार वेळा निवडून येत चौकार मारला आहे.