जलसंपदा विभागाने सिंचन प्रकल्पांविषयी मांडलेली श्वेतपत्रिका चुकीची आहे. ही श्वेतपत्रिका सादर करताना अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांवर दबाव आणला होता. ही श्वेतपत्रिका मान्य न केल्यास दोघांचेही भले होणार नसल्याची जाणीव त्यांनी करून दिली, असा गौप्यस्फोट रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केला आहे. ही श्वेतपत्रिका नव्हे तर, काँग्रेसची हितपत्रिका असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. छावा संघटनेच्यावतीने मराठा आरक्षणाकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी नाशिक ते मुंबई दिंडी सुरू करण्यात आली. त्यानिमित्त येथील ईदगाह मैदानावर आयोजित मेळाव्यास आठवले यांनी हजेरी लावून या मागणीस आपले समर्थन असल्याचे स्पष्ट केले. तत्पुर्वी, झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी वेगवेगळ्या मुद्यांवर मत मांडले.
छावासह इतर संघटनांकडून मराठा समाजास आरक्षण देण्याची मागणी केली जात आहे. या मागणीला रिपाइंचा (आठवले गट) पाठींबा असल्याचे आठवले यांनी सांगितले. पक्षातर्फे १९ डिसेंबर रोजी नागपूर येथे याप्रश्नी मोर्चा काढला जाणार आहे. सध्या ओबीसी, अनुसूचित जाती-जमाती या घटकांसाठी असणारे आरक्षण ५० टक्के आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ही मर्यादा ७० टक्क्यांपर्यंत वाढविण्याची मागणी आठवले यांनी केली.
 आरक्षणाच्या मुद्यावरून रिपाइंच्या भूमिकेवरून महायुतीत काही अडचणी येऊ शकतात काय, या प्रश्नावर त्यांनी युतीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे सांगितले. शिवसेनेचा आरक्षणाला आधीपासून विरोध आहे. परंतु, एखाद्या प्रश्नावर उभयतांमध्ये परस्परविरोधी मत असू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.  
देशात सिंचन क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली असून त्या तुलनेत राज्यात या क्षेत्रातील वाढ अतिशय कमी आहे. तरी देखील काही नेते शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून मिरविण्यात धन्यता मानतात, असे कोणांचा उल्लेख न करता ते म्हणाले. आपण उपमुख्यमंत्रिपदावर होतो, याची आठवण रहावी म्हणून अजित पवारांना पुन्हा हे पद बहाल करण्यात आले आहे. भविष्यात काँग्रेस व राष्ट्रवादी निवडून येण्याची शक्यता नसल्याने हा निर्णय घेतला गेल्याची खिल्ली त्यांनी उडविली. १२ डिसेंबर रोजी महाराष्ट्र भारनियमनमुक्त करण्यात येणार असल्याची घोषणाही हवेत विरली आहे. राज्य शासनास महाराष्ट्र भारनियमनमुक्त करणे शक्य नाही. राज्य खरोखर भारनियमनमुक्त करावयाचे असेल तर आधी महाराष्ट्र काँग्रेसमुक्त करा, असेही त्यांनी सांगितले.
 शिवाजी पार्कचे शिवतीर्थ असे नामांतर करण्याच्या शिवसेनेच्या मागणीला रिपाइंचे समर्थन आहे. तसेच मुंबई महापौरांच्या निवासस्थानाच्या परिसरात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे यथोचित स्मारक उभारता येईल, असेही आठवले यांनी नमूद केले.  
छावा संघटनेचे अध्यक्ष अण्णासाहेब जावळे यांनी आपली संघटना बिगर राजकीय असल्याने मराठा आरक्षणाला पाठिंबा देणाऱ्या सर्वाचे स्वागत असल्याचे सांगितले. ईदगाह मैदानावर मेळावा तीन ते चार तास उशिराने सुरू झाला.  सायंकाळी उशिरापर्यंत मान्यवरांची भाषणे झाल्यानंतर दिंडी मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाली.     

Story img Loader