माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना आज नंदुरबार येथे पत्रकारपरिषदेत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधत, टीका केली. तसेच, शेतकऱ्यांच्या एफआरपीच्या मुद्द्य्यावरूनही सदाभाऊ खोत यांनी टिप्पणी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सदाभाऊ खोत म्हणाले, “शरद पवार हे मोठे नेते आहेत. प्रचंड बुद्धीवादी व्यक्तिमत्व या राज्यात आहे. अनेकांना वेगवेगळी स्वप्न पडत असतात. त्यांना देखील अनेक वर्षे झालं पंतप्रधान पदाचं स्वप्न पडत आहे. पण मी सगळ्याचा अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं, दक्षिणेत राज्य पातळीवरील जे पक्ष आहेत, त्यांचे कुणाचे २० तर कुणाचे ३०, ४० असे खासदार आहेत. पण तिथला मात्र कुठल्याही पक्षाचा नेता म्हणालेला नाही की, भावी पंतप्रधान किंव मला पंतप्रधान व्हायचं आहे. पण भारी आहे, साडेतीन जिल्ह्याचा पक्ष आणि साडेतीन खासदारांचा नेता. साडेतीनशे बहुमत लागतं त्या पंतप्रधान पदाचं स्वप्न बघत असतो. आता मलाही वाटतं की त्यांचं ऐकून ऐकून आपल्यालाही असंच एखादं स्वप्न पडावं, पण मला काही पडत नाही. म्हणून निश्चितपणे पवार म्हणाले की ती वनस्पती होती. म्हणजे हर्बलयुक्त गांजा याचं संशोधन पवारांनी लावलेलं, मलिक यांनी लावलं आहे. राज्यातील कृषी विद्यापिठांना जे जमलं नाही ते पवार आणि मलिक यांना जमलं. नवीन वाणाचा शोध त्यांनी लावलेला आहे. निश्चितच त्या नवीन वाणाचं बियाण, राज्यातील शेतकऱ्याला द्याव. मग हर्बलयुक्त शेतकरी आमच्याही शेतात येऊ दे आणि नवाब मलिकांच्या जावायासारखं आम्हाली श्रीमंत होऊ द्या. ही मागणी मी दोन दिवसांपूर्वी त्यांच्याकडे केलेली आहे. म्हणून निश्चतपणे म्हणावं लागेल की हे गांजाडं सरकार आहे. हे गांजा ओढून सरकार चालवत आहे. हे आता यामधून स्पष्ट झालेलं आहे.”

तसेच, “जे लोक आता आंदोलन करत आहेत, आंदोलनाची भाषा बोलत आहेत. मला वाटतं ते सरकारमध्ये आहे, त्यांनी सरकारकडे जाब विचारावा. नाही तर लिहून आणावं की आम्ही एफआरपीचे तुकडे करणार नाही. एकरकमी एफआरपी शेतकऱ्याला देऊ. म्हणून आम्ही आता मागणी केलेली आहे, की पहिला हप्ता शेतकऱ्यांना एफआरपी प्रमाणे एक रकमी मिळाला पाहिजे आणि दुसरा हप्ता हा टप्प्याटप्प्याने साखर विक्री झाल्यावर, माल विक्री झाल्यानंतर असं ३ हजार ३०० रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्याला मिळावे. ही आमची भूमिका आहे. असं सदाभाऊ खोत यांन यावेळी सांगितलं.”

याचबरोबर, “पण जी माणसं शेतकऱ्यांची बाजू घेऊन भूमिका मांडत आहेत. ते तर सरकारमध्ये आहेत, एका बाजूला सरकारमधून बाहेर पडायचं नाही आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचा पुळका दाखवयचा. म्हणजे मगरीच्या डोळ्यातील अश्रू सारखा हा प्रकार आहे. असंही त्यांनी बोलून दाखवलं.”

तर, “या राज्याचे मुख्यमंत्री भाग्यशाली आहेत. त्यांना शेतीमधलं एवढं समजतं, एवढं समजतं की, त्यांना शेतीची सल्लागार जो आहे किशोर तिवारी हे आर्यन खानला सोडावं, त्यावर अन्याय कसा सुरू आहे, यासाठी न्यायालयात गेले. ही गोष्टही आनंदाची आहे, म्हणजे जर कुणी गांजा बाळगला असेल किंवा अंमली पदार्थ बाळगले असतील, तर त्यासाठी शिवसेना न्यायलयात जाते. याचं मी खऱ्या अर्थाने स्वागत करतो, त्याचा निषेध नाही करणार. कारण, मला वाटतं की आता भविष्यकाळात आपल्या राज्यात अमली पदार्थांचा पेरा बहुतेक शिवसेनेला करायचा आहे आणि शेतकऱ्यांमध्ये भरभराट आणायची आहे, म्हणून शिवसेना न्यायालयात आर्यन खानच्या बाजूने उतरलेली मी पाहिलेली आहे. असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेवर टीका केली.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This leader of three and a half mps sadabhau khots target on sharad pawar said msr