सांगली : मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्य क्षेत्रातील विष्णुदास भावे गौरवपदक जेष्ठ अभिनेते, नाट्य कलाकार प्रशांत दामले यांना मंगळवारी जाहीर करण्यात आले. गौरवपदक, रोख रक्कम रु. २५ हजार, स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ असे गौरवपदकाचे स्वरूप आहे. ५ नोव्हेंबर रोजी रंगभूमीदिनाचे औचित्य साधून पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
विष्णुदास भावे गौरवपदक पुरस्कार हा मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा पुरस्कार असून नाट्य क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्यांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समिती, सांगली ही संस्था गेली ८० वर्षे नाट्यक्षेत्रात कार्य करीत आहे. संस्थेतर्फे ५ नोव्हेंबर रंगभूमीदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. रंगभूमीदिनाचे औचित्य साधून नाटककार विष्णुदास भावे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ नाट्यक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रंगकर्मीस विष्णुदास भावे गौरवपदक देऊन सन्मानित करणेत येते, अशी माहिती अखिल महाराष्ट्र नाट्यविद्या मंदिर समितीचे अध्यक्ष अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी दिली.
हेही वाचा – मुंबई विमानतळ पुढील सहा तास बंद, ‘हे’ आहे कारण; ५०० विमानसेवांना बसणार फटका
अखिल भारतीय नाट्य परिषद, मध्यवर्ती, मुंबईचे अध्यक्ष. प्रशांत दामले हे सुप्रसिद्ध मराठी अभिनेते आहेत, त्यांनी गेली चार दशके असंख्य मराठी नाटके, चित्रपट, आणि टीव्ही मालिकांमध्ये अभिनय केला आहे. ते मराठी चित्रपट अभिनेता, दूरदर्शन अभिनेता, रंगमंच अभिनेता, गायक, पार्श्वगायक, नाट्यनिर्माते आहेत. विनोदी अभिनयासाठी मराठी नाटक आणि चित्रपट जगतात ते परिचित आहेत. कलेच्या प्रवासात त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. त्यांच्या नावावर पाच लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स आहेत. त्यांनी नाटकाशिवाय ३७ मराठी चित्रपट आणि २४ दूरदर्शन मालिकांमध्ये काम केले आहे. ज्यामध्ये ‘आम्ही सारे खवय्ये’ ही अत्यंत लोकप्रिय मालिका समाविष्ट आहे. आतापर्यंत त्यांना २० पेक्षा जास्त पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र राज्य पुरस्कार, नाट्यदर्पण पुरस्कार, कलारंजन पुरस्कार, दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेचे विविध पुरस्कार यांचा समावेश आहे.
फेब्रुवारी १९८३ पासून आज अखेर १२५०० पेक्षा जास्त नाटकांचे प्रयोग त्यांनी केले आहेत. त्यांची जी गाजलेली नाटके रसिकांच्या पसंतीस उतरली आहेत त्यातील काही खालीलप्रमाणे.
टूर टूर, पाहुणा, चाल काहीतरीच काय, गेला माधव कुणीकडे, बे दुणे चार, शूः कुठे बोलायचे नाही, एका लग्नाची गोष्ट, एका लग्नाची पुढची गोष्ट, जादू तेरी नजर, कार्टी काळजात घुसली, साखर खाल्लेला माणूस, सारखं काहीतरी होतय, लेकुरे उदंड झाली आदी.