मुळा नदीवरील पिंपळगाव खांड लघुपाटबंधारे तलावात या वर्षी पाणी अडवण्यात येणार असून, त्यामुळे अकोले व संगमनेर तालुक्यांतील मुळा नदीकाठच्या गावांना अर्धा टीएमसी पाणी उपलब्ध होणार आहे.
मुळा नदीवरील या तलावाची साठवणक्षमता ६०० दक्षलक्ष घनफूट आहे.
दोन वर्षांपासून या प्रकल्पाचे काम सुरू असून आदिवासी उपयोजनेतून त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. तलावाच्या भिंतीची लांबी २५५ मीटर असून उंची ३१ मीटर आहे. पिंपळगाव खांड येथे नदी तळाचा तळांक ६४६.११० मीटर असून धरणाची माथा पातळी ६७६.५० मीटर आहे. धरणास १८९ मीटर लांबीचा सांडवा असून सांडव्याचा तळांक ६७०.५० मीटर आहे. धरणाच्या भिंतीचे बांधकाम कोलग्राऊड पद्धतीने करण्यात आले. उत्सारी भागातील सांडव्यापर्यंतचे बांधकाम पूर्ण झाले असून सध्या धरणाच्या भिंतीत असणाऱ्या सिंचनविमोचकावर लोखंडी दार बसवण्याचे काम सुरू आहे. चार फूट गुणिले चार फूट आकाराच्या सिंचनविमोचकाची क्षमता १०० क्युसेक एवढी आहे. विमोचकाचे आपत्कालीन दार बसवण्यात आले असून सेवाद्वार बसवण्याचे काम या आठवडय़ात पूर्ण होईल. त्यानंतर धरणात पाणी अडवले जाणार आहे.
धरणाचा पाणी फुगवटा कोतुळेश्वर मंदिरापर्यंत जाणार असून कोतूळ येथील मुळा नदीवरील मोठा पूलही पाण्यात बुडणार आहे. त्यामुळे धरणात पाणी अडवल्यानंतर अकोले कोतुळे वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू ठेवावी लागेल. तसेच धरणाच्या पाण्यात चार वीज रोहित्र व सुमारे ७५ विजेचे खांब बुडणार आहे. या खांबांचे बुडीत क्षेत्राबाहेर स्थलांतर करण्याचेकाम अंतिम टप्प्यात आहे. प्रकल्पग्रस्तांचा मात्र धरणात पाणी अडवण्यास विरोध आहे. या प्रकल्पात प्रकल्पग्रस्तांची ६८.३४ हेक्टर जमीन बुडणार आहे. तथापि या ठिकाणी असणारा मुळा नदीचा विसर्ग लक्षात घेता धरणाचे दार बंद केले नाही तरीही पावसाळय़ात धरण काठोकाठ भरून सांडव्यावरून पाणी मुळा नदीत पडणार आहे.
या तलवास कालवे नाहीत, त्याचा उपयोग मुख्यत: साठवण तलाव म्हणून होणार असून संगमनेर अकोले तालुक्यातील मुळा नदीवरील विविध कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांमध्ये तलावातून सोडलेले पाणी अडवले जाईल. तेवीस गावांमधील सुमारे १ हजार ७७८ हेक्टर क्षेत्रास उपसा सिंचनाद्वारे त्याचा लाभ होणार आहे.

Story img Loader