‘कोविड’चे नियम पाळून यावर्षीचा कृष्णाबाई उत्सव साजरा करावा. आपल्या उत्सवाला साडेतीनशे वर्षांची परंपरा आहे ही परंपरा खंडित होऊ नये म्हणून सर्वांनी नियम पाळून हा उत्सव साजरा करुया, असे आवाहन प्रांताधिकारी संगीता राजापूरकर चौगुले यांनी केले आहे.

वाई शहरातील सात घाटावर माघ शुद्ध प्रतिपदा (दि १२ फेब्रुवारी ते फाल्गुन पौर्णिमा २४ मार्च) या कालावधीत साजरा होणाऱ्या कृष्णाबाई उत्सवा संदर्भात मार्गदर्शनासाठी प्रांताधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पोलीस उपअधीक्षक डॉक्टर शीतल जानवे खराडे, तहसीलदार रंणजीत भोसले, पोलीस उपनिरीक्षक संजय मोतेकर, पालिका निरीक्षक नारायण गोसावी आणि कृष्णाबाई संस्थानचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

वाई शहरात शिवाजी महाराजांच्या काळापासून परंपरेने साजरा होणारा कृष्णाबाई उत्सव, यंदा ‘कोविड’चे नियम पाळून साजरा करण्यात यावा, असे या बैठकीत ठरवण्यात आले.

तसेच, यावर्षी कोणत्याही घाटावर मंडप उभारता येणार नाही. उत्सवात दररोज होणाऱ्या पूजाअर्चा, लघुरुद्र, आरती आदी धार्मिक विधी मर्यादित लोकांमध्येच पार पाडावेत. भजन, कीर्तन, गायन, करमणूक, हळदी-कुंकू, महाप्रसाद (जेवणाचा) कार्यक्रम, छबिना मिरवणूक व रथोत्सव करता येणार नाही. कृष्णा मातेचे दर्शन घेता येणार नाही. दर्शनासाठी गर्दी जमवता येणार नाही. त्यासाठी समाज माध्यमांचा पर्याय वापरता येईल काय? याची चाचपणी करावी. कृष्णा मातेचे ओटीभरण, नैवेद्य आदीलाही बंदी राहील.

कृष्णाबाई संस्थान यांच्यावतीने माधवराव तावरे, विवेक पटवर्धन, सतिष शेंडे, कौस्तुभ वैद्य, चरण गायकवाड,विश्वास पवार आदींनी आपली भूमिका मांडली. या उत्सवाला मोठे धार्मिक अधिष्ठान आहे. उत्सवाचे पूर्णतः सांस्कृतिक व धार्मिक स्वरूप आहे. उत्सवात साडेतीनशे वर्षांत कोणताही गोंधळ झालेला नाही. उत्सवात सर्व जाती,धर्मातील लोक आनंदाने शिस्तीत सहभागी होतात. उत्सवाला आजपर्यंत कधीही पोलीस बंदोबस्तही लागलेला नाही. यामुळे कोविडचे नियम पळून उत्सव साजरा केला जात आहे. मंदिरातील दर्शन खुले झाले आहे त्या पद्धतीने नियम पळून कृष्णा मातेचे दर्शन उपलब्ध व्हावे अशी विनंती कृष्णाबाई संस्थानांच्या वतीने करण्यात आली.

या बैठकीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवून त्यांच्याकडून भाविकांना दर्शन खुले करण्याबाबत अभिप्राय मागविण्यात येईल, असे प्रांताधिकारी संगीता राजापूरकर चौगुले व पोलीस उपअधीक्षक डॉ.शीतल जानवे खराडे यांनी सांगितले. यावेळी रमेश जोशी, उमेश रास्ते, राजू सोहनी, स्वरुप मुळे, अक्षय कान्हेरे, चिंतामणी मेहंदळे, सुयोग प्रभुणे, शंतनू सोहनी, ज्ञानेश्वर महाजन, मुकुंद शेंडे, अशोक मलटणे आदी उपस्थित होते. प्रशासनाच्यावतीने विश्वनाथ कांबळे, राजेंद्र कांबळे, पोलीस नाईक प्रशांत शिंदे प्रताप भोसले आदी उपस्थित होते.