संगमनेर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वर्चस्वाखालील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार ११ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करणे, ११ मे रोजी मतदान व १२ मे रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित होईल. कारखान्यातील विद्यमान सत्ताधारी बाळासाहेब थोरात यांच्या दृष्टीने ही निवडणूक अस्मितेची असेल, तर विरोधी गटाकडे राजकीय सत्ता असल्याने ते सर्व शक्तीनिशी निवडणूक लढवण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे यावेळी ही निवडणूक रंगतदार ठरणार आहे. साहजिकच पुन्हा एकदा राजकीय धुळवड उडणार आहे.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष राहील. दि. १९ मार्चला कारखान्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. आज जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार ३ ते ११ एप्रिल दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. १५ ते २९ एप्रिल दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. त्यानंतर २ मेला उमेदवारांची अंतिम यादी आणि चिन्ह वाटप जाहीर होईल. ११ मे रोजी मतदान व १२ मे रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित केला जाईल. संगमनेरचे प्रांत अधिकारी शैलेश हिंगे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

संगमनेरच्या सहकार क्षेत्रात साखर कारखाना ही मातृसंस्था मानली जाते. संगमनेर भाग सहकारी साखर कारखाना सुरू झाल्यापासून सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या वर्चस्वाखाली होता. त्यांच्या निधनानंतर बाळासाहेब थोरात यांनी ही सत्ता अबाधित राखली. सुरुवातीच्या काही निवडणुका अत्यंत चुरशीने झाल्या. थोरात यांची सत्ता स्थिर झाल्यानंतर मात्र अनेक निवडणुका बिनविरोध झाल्या. या दरम्यानच्या काळात राज्याच्या सहकार क्षेत्रात साखर कारखान्याचे नाव झाले. कारखाना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याबरोबरच ऊस उत्पादकांना सातत्याने चढा भाव देत राहिला. राज्य, देश पातळीवरील अनेक पुरस्कार कारखान्याला मिळाले. कारखान्याच्या क्षमता विस्तारासह वेगवेगळे नावीन्यपूर्ण प्रकल्प उभे करत उत्पादनाचे अन्य स्रोत निवडण्यात आले.

गेल्या काही निवडणुकांपासून बिनविरोध निवडणुकीची कारखान्याची परंपरा निर्माण झाली असली तरी विधानसभा निवडणुकीच्या निकालाने संपूर्ण राजकीय चित्र पालटले आहे. विधानसभेतील धक्कादायक निकालानंतर थोरात विरोधी गटाचे बळ वाढले आहे. विधानसभा निवडणुकीतील ऐतिहासिक विजयानंतर आमदार अमोल खताळ यांनी आगामी नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था आणि संगमनेर साखर कारखान्याची निवडणूक पूर्ण ताकतीने लढवण्याची घोषणा तेव्हाच केली होती. कालही संगमनेरमध्ये झालेल्या कारखान्याच्या सभासदांच्या मेळाव्यात याच गोष्टीचा त्यांनी पुनरुच्चार केला. दुसरीकडे थोरात गट कमालीचा सावध झाला असून, विधानसभेचा निकाल घोषित होताच त्यांनी कारखान्याच्या निवडणूक तयारीला सुरुवात केली. कारखान्याच्या मतदारांची संख्या ठरावीक असते. आज तरी बहुतांश मतदार थोरात गटाला मानणारे आहेत.

मोठे राजकीय पाठबळ लाभल्याने विरोधक निकराने निवडणुकीत उतरतील हेही उघड आहे. त्यामुळे जसजशी निवडणूक पुढे जाईल तसेच चित्र अधिक सुस्पष्ट होईल. विधानसभेप्रमाणेच आमदार खताळ कारखान्याच्या निवडणुकीचा चेहरा असले तरी खरी सूत्रे पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि माजी खासदार सुजय विखे यांच्याच हाती राहणार हेही उघड आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्याच्या सहकारात आता राजकीय रणधुमाळी उडणार आहे. येत्या काही दिवसांत मंत्री विखे यांच्या वर्चस्वाखालील विखे कारखान्याची निवडणूकही जाहीर होणार आहे. त्यामुळे थोरात व विखे परस्परांच्या कारखाना निवडणुकीत लक्ष घालणार का, हाच औत्सक्याचा विषय ठरणार आहे.