वाई: लोकसभा निवडणुकांसाठी सातारा जिल्ह्याचा उमेदवार म्हणून ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष इच्छा व्यक्त केली आहे ते व्यक्त करणारे माझ्यासाठीच बोलत आहेत अशी राजकीय मिश्किली खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. दरम्यान मी लोकसभेचा राजीनामा देऊन राजकीय आत्महत्या केली तर तसेही असेल पण राजघराण्याशी माझी बांधिलकी आहे म्हणून मी तत्वांशी तडजोड केली नाही असे खणखणीत प्रतिपादन उदयनराजे यांनी केले

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जलमंदिर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून साकारलेल्या विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ उदयनराजे यांचे निवासस्थान जलमंदिर येथून झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. त्यावेळी केंद्रीय मंत्री अजयजी मिश्रा, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, माजी आमदार मदनदादा भोसले, सुनील काटकर, काका धुमाळ, रंजना रावत, गीतांजली कदम, इत्यादी उपस्थित होते.

आणखी वाचा-सातारा : विकसित भारत संकल्प यात्रेस विरोध अथवा किंवा समर्थनाने फरक पडत नाही- अजयकुमार मिश्रा

उदयनराजे भोसले म्हणाले, मी राजकीय आत्महत्या केली, पण घराण्याच्या तत्त्वांशी कधीही तडजोड केली नाही . राज घराण्यातील तत्त्वांशी माझी कायमच बांधिलकी आहे. छत्रपती शिवरायांनी आचरणात आणलेला सर्वधर्मसमभाव हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी आचरणात आणला आहे. राजकारणाची जी तत्वे जे अंगी करतात त्यांच्याबरोबर राहणे हे मी माझे कर्तव्य समजतो. जे मनाला पटत नाही ते मी करत नाही. २०१९ च्या तत्कालीन लोकसभा निवडणुकीनंतरही लोकसभेचा राजीनामा देऊन मी विशिष्ट गटातून बाहेर पडलो. ही कदाचित राजकीय आत्महत्या असेलही, पण लोकांच्या कल्याणासाठी आणि तात्विक राजकारणाचा पुरस्कार म्हणून मी नेहमी समाजकारण करतो, राजकारण करत नाही. माणूस लोकांच्या नजरेतून कोसळला तरी त्याला सुधारण्याची संधी असते. पण स्वतःच्या नजरेत जर चुकला तर तो पुन्हा उभा राहू शकत नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सध्या उत्तम काम सुरू आहे. त्यांना दिल्ली येथे भेटलो असता अनेक विविध विषयांवर मी चर्चा केली. मराठा आरक्षणाच्या संदर्भातही तपशील त्यांनी जाणून घेतले. महाराष्ट्रातील सारथी संस्थेला जास्तीत जास्त निधी देणे आणि संस्थेचे सक्षमीकरण करणे या संदर्भात आपण मुद्दे मांडल्याचे त्यांनी सांगितले. सातारा लोकसभेचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. मात्र लोकसभेसाठी प्रत्येक जण दंड थोपटत आहेत. आपण सातारा लोकसभेसाठी इच्छुक आहात की नाही असा प्रश्न उदयनराजे यांना पत्रकारांनी विचारला असता ते म्हणाले, लोकसभेसाठी ज्यांनी ज्यांनी इच्छा व्यक्त केली आहे, ते माझ्यासाठीच बोलत आहेत अशी विष केली उदयनराजे यांनी करताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

आणखी वाचा-“अजित पवारांचं ज्ञान सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, पण मराठा…”, मनोज जरांगे पाटील यांचा टोला

विश्वकर्मा योजनेच्या रथयात्रेला केंद्रीय मंत्री अजय मिश्रा आणि उदयनराजे भोसले यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला . सातारा जिल्ह्यात एकूण २४ रथ या निमित्ताने ठीकठिकाणी फिरणार आहेत या योजनेअंतर्गत १८ प्रकारच्या पारंपारिक कारागिरांना व्यवसाय सुरू करण्यासाठी पाच टक्के व्याजदराने एक लाख रुपयापर्यंत कर्ज मिळणार आहे. सातारा लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रबोधनासाठी रथ तयार करण्यात आले असून या योजनेची वैशिष्ट्ये आणि फायदे सांगून कारागिरांना या योजनेत सहभागी केले जाणार आहे . या कर्ज योजनेचा सातारा जिल्ह्यातील कारागिरांनी निश्चित लाभ घ्यावा असे आवाहन खासदार उदयनराजे व केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांनी केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Those expressing desire for lok sabha candidacy speak for me says udayanraje bhosale mrj