लोकसत्ता प्रतिनिधी
सोलापूर : आम्ही केवळ हिंदू राष्ट्र संकल्पाची भाषा बोलतो. हे राष्ट्र ज्यांना मान्य नाही, त्यांनी पाकिस्तानात चालते व्हावे. हवे तर त्यांना आम्ही पाकिस्तानचे तिकीट काढून देऊ, असे वक्तव्य बागेश्वर धामाचे पीठाधीश पंडित धीरेंदकृष्ण शास्त्री यांनी केले.
विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सोलापुरात होम मैदानावर पं. धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या उपस्थितीत संत संमेलन झाले. त्यावेळी हजारोंच्या जनसमुदायासमोर बोलताना त्यांनी हिंदुराष्ट्र निर्मितीवर जोर दिला. महाराष्ट्र साहित्य परिषद दक्षिण सोलापूर शाखा आणि श्री बागेश्वर धाम सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या संत संमेलनात धीरेंद्रकृष्ण शास्त्रींच्या भाषणातून विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हिंदू मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न दिसून आला.
हिंदू राष्ट्र निर्माणासाठी देशभरात आता हिंदू जागा होत आहे. आजचा हिंदू पूर्वीचा डरपोक राहिला नाही. तर अन्याय आणि उपद्रव करणाऱ्या, धर्मविरोधकांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर देण्यासाठी पेटून उठल्याचे धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी सांगितले.
धीरेंदकृष्ण शास्त्री म्हणाले, की हिंदू राष्ट्रासाठी अवघ्या हिंदूंनी जाती-पातीत न विभागता एकसंधपणे, मजबुतीने उभे राहावे लागणार आहे. हिंदूंना कोणाच्या भीतीमुळे घाबरून पळायचे नाही, तर सदैव जागे व्हायचे आहे. आम्ही जातीपातीत विभागलो गेलो, मुलांना धर्माची शिकवण दिली नाही. म्हणून काश्मीरमधून पंडितांना पलायन करावे लागले, मणिपूर जळाले, पश्चिम बंगालमध्ये अत्याचार वाढले, महाराष्ट्रात पालघरमध्ये साधूंना मारले गेले. अशा अनेक अत्याचारांचा दाखला देत, हिंदू राष्ट्र निर्मितीची खरी प्रेरणा महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यातून घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले. समोरचा शत्रू कितीही खतरनाक असू द्या, पण हिंदू एक झाला तर कोणी काही करू शकणार नाही, असेही ते म्हणाले.