अहिल्यानगरः छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर या महापुरुषांनी महाराष्ट्र व देश घडवला आहे. त्यामुळे छत्रपतींच्या जयंतीच्या दिवशी त्यांना श्रद्धांजली वाहणाऱ्यांना महाराजांचा वारसा समजलेला नाही, हे स्पष्ट होते. त्यामुळे त्यांना राजकारणात राहण्याचा अधिकार नाही व त्यांनी राजकारण सोडले पाहिजे, अशी प्रतिक्रिया उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज, बुधवारी रात्री येथे व्यक्त केली.

संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांना ‘श्रद्धांजली’ वाहिल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यावर महायुतीकडून त्यांच्यावर टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री उदय सामंत यांनीही वरील मत व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर तसेच संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज व सर्व संत परंपरेवर जो कोणी वादग्रस्त भाष्य करेल, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना पुणे पोलिसांना आपण दिल्याच्या सांगून असे वादग्रस्त भाष्य करणाऱ्यांची प्रवृत्ती ठेचून काढली पाहिजे, असे मतही सामंत व्यक्त करताना आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका असा सज्जड इशाराही असे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांना दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडी सरकार येत असताना दोन्ही पवारांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास विरोध केल्याचे भाष्य ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मंत्री सामंत म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नुकताच दिल्लीत शरद पवार यांनी केलेला सत्कार काहींच्या वर्मी लागला आहे व त्यातून असे भाष्य होते. माझ्या माहितीप्रमाणे शरद पवार साहेब कधीही दुसऱ्या पक्षात असा हस्तक्षेप करीत नाहीत. मात्र, अशा वक्तव्यातून एकनाथ शिंदेंवर टीका केली जात असली तरी ती आम्ही मनावर घेत नाही व जनतेनेही घेऊ नये. कारण त्यांनी ९७ जागा लढवल्या व त्यांच्या फक्त २० आल्या, आम्ही ८० लढवल्या व आमचे ६० जण निवडून आले. त्यामुळे त्यांनी बोलत रहावे, त्यांना शिंदेंच्या बदनामीचा पोटशूळ उठला आहे अशी टीका सामंत यांनी राऊत यांचे नाव न घेता केली.

जेएनयुमध्ये मराठी अध्यासन

दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात येत्या दि. २७ रोजी कुसुमाग्रजांच्या नावाने मराठी अध्यासन सुरू होत असल्याचे सांगून सामंत म्हणाले, असे अध्यासन सुरू होण्यासाठी मुख्यमंत्रीपदी असताना एकनाथ शिंदे यांनीच दिल्ली विद्यापीठाला १० कोटी रुपये दिले आहेत, असेही मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.

‘कोल्ड वॉर’ वगैरे काही नाही

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात ‘कोल्ड वार’ असल्याच्या चर्चा निराधार आहेत. शिवजयंतीच्या कार्यक्रमात तिघेही एकत्रच होते, सारे काही ‘ठंडा-ठंडा कुल-कुल’ आहे असे तिघांनी स्पष्ट केले आहे. मात्र ज्यांना पोटशुळ आहे असे त्यांच्यात वाद असल्याची चर्चा घडवण्याचा प्रयत्न करतात, असा दावाही कोणाचाही नाव न घेता सामंत यांनी केला.

विचार जपल्याने आकर्षण 

‘ऑपरेशन टायगर’ वगैरे काही नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जपल्याने त्या आकर्षणापोटी ठाकरे सेनेचे अनेक जण शिंदे यांच्याकडे येत आहेत व यासाठी त्यांना रोज दोन तास द्यावे लागत आहेत. मात्र काही जण मंत्रीपद व अन्य पदे गेली तरी अजूनही तोऱ्यातच आहेत अशी टिका सामंत यांनी उद्धव ठाकरेंचे नाव न घेता केली. मात्र कुठलाही पक्ष संपत नाही, असे भाष्यही त्यांनी केले .

Story img Loader