Devendra Fadnavis on Mahayuti: महायुती सरकारचा शपथविधी होऊन अद्याप तीन महिने पूर्ण झालेले नाहीत, तोच मंत्रिमंडळातील एका कॅबिनेट मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला आहे. तर दुसऱ्या मंत्र्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. युती-आघाडीचे सरकार चालवत असताना मित्रपक्षांच्या नेत्यांनी चुकीचे काही केल्यास त्याचा फटका भाजपालाही बसतो का? यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टीव्ही ९ च्या मुलाखतीत प्रश्न विचारला गेला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोखठोक उत्तर दिले असून महायुतीमधील मित्रपक्षांच्या नेत्यांना सूचक इशारा दिला आहे.

धनंजय मुंडे यांनी ४ मार्च रोजी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. संतोष देशमुख हत्या प्रकरणात विरोधकांकडून टीका झाल्यानंतर आणि आरोपीशी जवळचे संबंध असल्यामुळे मुंडेंना मंत्रीपद सोडावे लागले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) दुसरे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याही राजीनाम्याची मागणी होत आहे. टीव्ही ९ वृत्तवाहिनीच्या कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या मंत्र्यावर होणाऱ्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली.

माणिकराव कोकाटेंच्या बाबतीत ते म्हणाले, आज न्यायालयाने माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार शिक्षेला स्थगिती मिळाली असेल तर पद जात नाही. कोकाटे यांचे प्रकरण दिवाणी न्यायालयात चालले होते. दिवाणी न्यायालयाने त्यांचा व्यवहार योग्य असल्याचा निकाल दिला होता. मात्र दिवाणी न्यायालयाचा निकाल डावलून फौजदारी न्यायालयाने त्यांना दोषी मानले होते. या निकालाच्या विरोधात कोकाटे वरच्या न्यायालयात गेले आहेत.

जो चूक करेल त्याला…

महायुतीमधील ज्या दोन मंत्र्यांवर आरोप झाले, ते दोन्हीही मंत्री मित्र पक्षातील आहेत. युतीमधील मंत्री काही चुकीचे करत असेल तर त्याचा तोटा भाजपालाही सहन करावा लागतो का? याबद्दल मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले जाते का? असा प्रश्न यावेळी देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, मंत्र्यांवर आरोप झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले जाणारच. पण दोन गोष्टींचा विचार करावा लागेल. एकतर युतीधर्माचे मी पालन करणारच आहे. पण युतीमधील मंत्र्यांनाही झिरो टॉलरन्सचे धोरण लागू असेल. फक्त माझ्या (भाजपाच्या) लोकांसाठीच मी झिरो टॉलरन्सचे धोरण ठेवणार, असे नाही.

जिथे जिथे जो चूक करेल, तो आमच्या मित्रपक्षांचाही माणूस असू द्या, आम्ही त्याच्यावर कारवाई करणार.

राजीनामा देण्यासाठी मुंडेंना धमकी दिली का?

धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा यासाठी तुम्हाला त्यांना खरंच धमकी द्यावी लागली का? असाही प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ज्या प्रकारे संतोष देशमुखांची हत्या झाली, तसेच या हत्येच्या प्रकरणात ज्याला मुख्य सूत्रधार आरोपपत्रात म्हटले आहे आणि तो व्यक्ती जर एखाद्या मंत्र्याच्या जवळचा असेल तर त्या मंत्र्याने नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिला पाहिजे. आता कधी-कधी अशा निर्णयाला थोडा वेळ लागतो. पण आम्ही याबाबत ठाम भूमिका घेतली आणि त्यांनी देखील राजीनामा दिला.”

Story img Loader