वाई : बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या नावाने मते मागितली म्हणून त्यांचा मतदानाचा अधिकार सहा वर्षांसाठी काढून घेण्यात आला होता आता तर सर्रास हिंदुत्वाच्या नावाने मते मागितली जातात. मात्र यावेळी कोणतीच कारवाई होताना दिसत नाही. ज्यांच्या हातात अधिकार आहे त्यांनी संविधान आणि घटनेचे रक्षण करणे गरजेचे असल्याचे मत राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी साताऱ्यात व्यक्त केले. सातारा येथील शासकीय विश्रामगृहात अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
सध्या राज्य सरकारची आर्थिक ओढाताण सुरू आहे. आर्थिक पाहणी अहवालात तर महाराष्ट्राची पीछेहाट होत असल्याचे दिसून येते. जनतेच्या पैशातून सरसकट करोडो रुपये जाहिरातीवर खर्च होत आहे .या जाहिरातीमुळे लोकांना यांची तोंडी पहायची नसली तरी सुद्धा पहावी लागत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रातील साडेतीन जिल्ह्यांपुरता मर्यादित असल्याचे फडणवीस कर्नाटक मध्ये बोलण्याचे निदर्शनास आणून दिले असता ते नेहमी विरोधी पक्षांना कमी लेखण्याचे काम ते नेहमी करत असतात त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सध्या राज्यात विरोधी पक्षच नाही असेही ते म्हणाले. त्यांनी आमच्या लोकांची काळजी करण्याचं कारण नाही. जर ३६ जिल्ह्यांपैकी आम्ही साडेतीन जिल्ह्यातले असू तर मग त्यांच्यासमोर कुणी विरोधकच दिसत नाही. कारण शिवसेनेची त्यांनी ती अवस्था केली. आम्ही तर साडेतीन जिल्ह्यातलेच आहोत. काँग्रेसबद्दलपण ते तेच म्हणत असतात. काँग्रेस संपवली पाहिजे अशीच भाजपाची वक्तव्यं असतात, असं अजित पवार म्हणाले.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे निवडणुकांनंतरही आमच्या सरकारला धोका नाही, असे म्हणाले होते. त्यावर ते म्हणाले, सत्तेत असताना कोण म्हणेल की आमच्या सरकारला धोका आहे. सरकार असेपर्यंत सगळे असंच म्हणणार. कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ गुंतले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संपूर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असून १३ कोटी जनतेचे प्रतिनिधी आहेत त्यामुळे त्यांनी विधानसभा निवडणुकांच्या प्रचारापेक्षा नुकसान ग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न कसे सुटतील याकडे लक्ष द्यावे असा मार्मिक टोला अजित दादा पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे
मुख्यमंत्र्यांनी कर्नाटक विधानसभेच्या प्रचारात गुंतण्यापेक्षा बांधावर जाऊन बळीराजाचे प्रश्न प्राधान्य क्रमाने सोडवले पाहिजेत. जर निधी उपलब्ध नसेल तर वित्त विभागाशी बसून ते चर्चा करून सोडवायला पाहिजेत. शेतकऱ्यांच्या फळबागा आणि उन्हाळी पिके अवकाळी पावसामुळे वाया गेली आहेत. पण एकनाथ शिंदे हे त्यांच्या चाळीस आमदारांच्या गटाचे नेते आहेत तसेच ते महाराष्ट्राच्या जनतेचे प्रतिनिधी सुद्धा आहेत त्यामुळे दुसऱ्या राज्याचा प्रचार करण्यापेक्षा आपल्या राज्यांमध्ये बळीराजा किती पीडित अवस्थेत आहेत याची गांभीर्य ओळखून त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत प्रचार महत्त्वाचा नाही जितके शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत असा टोला अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.