व्यापारी, ठेकेदारांकडून होणारी गरीब आदिवासींची लूट थांबविण्यासाठी नक्षल चळवळ जन्माला आली. कालांतराने या चळवळीचे रूप बदलले आहे. निरपराध्यांची हत्या, उद्योगपतींकडून खंडणी वसुलीवर त्यांचा भर आहे. खंडणीचा हा सर्व पैसा वरिष्ठ कमिटी सदस्यांच्या चैनीवर खर्च होत आहे. त्यामुळे जंगलात सक्रीय नक्षल्यांमधील क्रांतिकारी विचार संपल्यात जमा आहे. विचाराने भारावून नक्षल चळवळीत दाखल होणाऱ्यांची संख्या जवळपास शून्य आहे. नक्षलवाद्यांचा जनाधार पूर्णत: ओसरला असल्याचे वास्तव गोपी उर्फ निरंगसाय मडावी याने मांडले.
आयुष्याची अनेक वष्रे नक्षल चळवळीत घालवून मोठ मोठय़ा हिंसक घटनांमध्ये सहभागी असलेल्या गोपीने आत्मसमर्पणानंतर खुल्या दिलाने मुलाखत देतांना नक्षलवादी चळवळीचे वास्तव मांडले आहे. एका मित्रासोबत २००२ मध्ये नक्षल चळवळीत प्रवेश केला. सुरुवातीला कोरची, खोब्रामेंढा आणि कुरखेडा या तीन दलममध्ये सदस्य म्हणून काम करतांना वरिष्ठ नक्षल्यांचा विश्वास संपादन केला. हिंसक कारवायात हातखंड असल्याने विभागीय समितीचा सदस्य झालो, असे सांगून नक्षलवाद्यांच्या योजनांबद्दल बोलताना तो म्हणाला, नक्षलवादी गावात आल्यावर त्यांचा गणवेष, नाचगाणे पाहून आदिवासी युवक-युवती त्यांच्याकडे आकर्षित होतात. विचाराने आकर्षित होणाऱ्यांची संख्या शून्य आहे. एकदा नक्षल्यांसोबत गेले की, मग तो पोलिसांची भीती दाखवतो. कोणत्या गावात जायचे, याचा निर्णय दोन तीन दिवसापूर्वी घेण्यात येतो. जीवाच्या भीतीमुळे काही नागरिक पोलिसांबद्दल नक्षलवाद्यांना माहिती देतात. त्यानुसार नक्षली योजना आखतात. स्फोटाचे साहित्य वरिष्ठ समिती सदस्यांकडून पोहोचविले जाते. एकमेकांसोबत संपर्कासाठी परवलीच्या शब्दांचा (कोडवर्ड) वापर केला जातो, तसेच वायरलेस यंत्रणाही सोबत असते.
सध्या केंद्रीय समितीचा सदस्य असलेल्या मिलिंद तेलतुंबडे याला भेटायला पुण्याकडील लोक जंगलात आले होते, असेही सांगून तो म्हणाला, खंडणीचा सर्व पैसा वरिष्ठ समिती सदस्यांकडे जातो. दलममध्ये काम करणाऱ्यांना गरजेपुरता पैसा दिला जातो. वरिष्ठांच्या संशयीवृत्तीमुळे आत्मसमर्पण केले. गडचिरोली-गोंदिया विभागाचा कमांडर पहाडसिंग उर्फ कुमारसाय कतलामी याने चळवळ सोडून न जाण्याचा सल्ला दिला होता. वरिष्ठांशी बिनसल्यानंतर आत्मसमर्पणाचा निर्णय पक्का केला. गेल्या पाच-सहा वर्षांंपासून शासनाने सुरू केलेल्या विविध योजनांचा लाभ पोलिसांच्या माध्यमातून आदिवासींपर्यंत पोहोचू लागला आहे. त्यामुळे पोलिस व प्रशासनावरचा विश्वास वाढला आहे. परिणामत: नक्षल्यांचा जनाधार झपाटय़ाने कमी होत आहे. नक्षल चळवळीत आदिवासींची केवळ दिशाभूल होत आहे. अंतर्गत वादामुळे अनेक नक्षलवादी वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळले असून आत्मसमर्पणाच्या तयारीत आहेत. त्यामुळे येत्या काही वर्षांत ही चळवळ इतिहासजमा होण्याची शक्यता गोपीने वर्तवली आहे.

Story img Loader