शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र शोकाकूल असताना व संपूर्ण जनजीवन ठप्प झाले असताना केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ दिल्लीने आयोजित केलेल्या शिक्षक पात्रता चाचणी परीक्षेत अक्षरश: गोंधळ करून टाकला. मंडळाच्या नतद्रष्ट अधिकाऱ्यांनी रविवारी होणारी ही परीक्षा रद्द केल्याचे घोषित केले व नंतर त्याच दिवशी ही परीक्षा घेण्याचा कृतघ्नपणा करून हजारो सुशिक्षित बेरोजगार शिक्षक पदविकाधारक उमेदवारांवर अन्याय केल्याची बाब समोर आली आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ नवी दिल्लीने पूर्व घोषित कार्यक्रमानुसार १८ नोव्हेंबर रोजी एकत्रित शिक्षक पात्रता चाचणी परीक्षा-२०१२ आयोजित केली होती, मात्र १७ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजून ३३ मिनिटांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. त्यामुळे रविवारच्या सर्व स्पर्धा व चाचणी परीक्षा रद्द करण्यात आल्या. केंद्रीय शिक्षण मंडळाची महाराष्ट्राच्या विभागीय व प्रमुख केंद्रांवर होणारी ही परीक्षा रद्द झाल्याचे मंडळाने दूरदर्शनच्या अनेक वाहिन्यांवरून जाहीर केले. शिवसेनाप्रमुखांच्या महायात्रेसाठी रविवारी महाराष्ट्र कडकडीत बंद होता. परीक्षा रद्द झाल्याच्या समजात महाराष्ट्रातील हजारो उमेदवार होते. त्यांनी त्यामुळे परीक्षा केंद्राकडे जाण्याची तसदी घेतली नाही, मात्र अशाही शोकाकूल वातावरणात, जनजीवन विस्कळीत झालेले असतांना व पर्याप्त उमेदवार विविध परीक्षा केंद्रावर पोहोचले नसतांना केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने ही परीक्षा घाईगर्दीत उरकून टाकली. त्यामुळे महाराष्ट्रातील हजारो शिक्षक पदविकाधारक उमेदवार या परीक्षेपासून वंचित राहिले.
वास्तविक, अशा शोकाकूल वातावरणात ही परीक्षा घेण्याचे काहीही कारण नव्हते. महाराष्ट्राच्या अस्मितेचा मानबिंदू असलेल्या शिवसेनाप्रमुखांच्या निधनामुळे बेरोजगार तरुणांची ही परीक्षा देण्याची मानसिक तयारी नव्हती. ठिकठिकाणचे जनजीवन थांबले होते, तसेच प्रवासासाठी वेळेवर वाहने उपलब्ध नव्हती. निवासासाठी व भोजनासाठी आवश्यक असलेले लॉंजिंग-बोर्डिगही या काळात बंद होते. तरीही ही परीक्षा घेण्याचा नतद्रष्टपणा दाखवून केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने राज्यातील हजारो उमेदवारांवर अन्याय केला. बुलढाणा जिल्ह्य़ातील असे शेकडो उमेदवार त्या दिवशी औरंगाबादच्या गोदावरी पब्लिक स्कूलमध्ये ही चाचणी परीक्षा देणार होते, मात्र टि.व्ही. चॅनेल व प्रसार माध्यमांनी ही परीक्षा रद्द झाल्याचे जाहीर केल्याने हे उमेदवार या परीक्षा केंद्राकडे फिरकले नाही, मात्र नंतर या उमेदवारांना परीक्षा झाल्याचे कळले तेव्हा त्यांना कपाळावर हात मारून घेतल्याशिवाय गत्यंतर उरले नाही.
एकतर शिक्षण पदविका घेतलेल्या सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी राज्याची सामान्य प्रवेश चाचणी परीक्षा अनेक वर्षांपासून बंद आहे. त्यात ही परीक्षा त्यांच्यासाठी एक आशेचा किरण होती, मात्र केंद्रीय शिक्षण मंडळाच्या घिसाडघाईमुळे त्यांच्या पदरी निराशा आली. ही परीक्षा पुन्हा नव्याने घ्यावी, अशी या उमेदवारांची मागणी आहे. यासंदर्भात केंद्रीय शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी बोलण्यास नकार दिला, मात्र या परीक्षेपासून वंचित राहिलेल्या बुलढाण्यातील शेकडो पदविकाधारक उमेदवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 21st Nov 2012 रोजी प्रकाशित
शिक्षक पात्रता परीक्षेपासून हजारो उमेदवार वंचित
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र शोकाकूल असताना व संपूर्ण जनजीवन ठप्प झाले असताना केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ दिल्लीने आयोजित केलेल्या शिक्षक पात्रता चाचणी परीक्षेत अक्षरश: गोंधळ करून टाकला.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 21-11-2012 at 06:12 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thousand candidate are deprived from teacher qualifying examination