लातूर : गैरप्रकार, पेपरफुटीच्या कथित प्रकरणांमुळे गाजत असलेल्या ‘नीट’ परीक्षेच्या तयारीसाठी देशभरातून हजारो विद्यार्थी दरवर्षी लातूरमध्ये येतात. शिकवणी वर्गांबरोबरच वसतिगृहे, खाणावळी, लॉन्ड्री आदी व्यवसायांचीही बाजारपेठ फुलली आहे. ही उलाढाल एक हजार कोटींच्या घरात जाऊन पोहोचली आहे. शिक्षकांचे वेतनही वर्षाला ३० लाख ते १ कोटींच्या आसपास आहे.
हेही वाचा >>> “शिंदे सरकार बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा”; काँग्रेसच्या शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी!
दरवर्षी सुमारे २५ हजार विद्यार्थी ‘नीट’च्या तयारीसाठी लातूरमध्ये येतात. राज्यातील शासकीय व खासगी वैद्याकीय महाविद्यालयांच्या प्रवेश क्षमतेच्या ३० टक्के विद्यार्थी एकट्या लातूरमधून परीक्षा दिलेले असतात. परिणामी लातूरमध्ये शिकवण्यांची बाजारपेठ फुलली आहे. पुस्तकांची व लेखन साहित्याच्या बाजारपेठेची उलाढाल ७०० कोटी रुपयांच्या आसपास असल्याचे माहितगारांनी सांगितले. ६० हजारांपासून ते एक लाख २० हजारपर्यंत वार्षिक शुल्क आकारले जाते. याखेरीज फेरपरीक्षा देणारेही मोठ्या संख्येने लातूरमध्ये येतात.
शिकवणी वर्गांच्या आसपास अनेकांनी खासगी वसतिगृहे उभी राहिली आहेत. दरमहा ३ ते ५ हजार रुपये भरून विद्यार्थी या वसतीगृहांमध्ये राहू शकतात. मुलांच्या निवासाची सोय करणाऱ्यांची उलाढाल शंभर कोटींपेक्षा अधिक आहे. याला जोडून खानावळींचा व्यवसायही भरभराटीला आला आहे. शिवाय नाश्ता, चहा, कॉफीची छोटी दुकानेही अनेक आहेत. दोन पैसे महाग असले तरी स्वच्छता राखल्यावर ग्राहक येतात, हे समीकरण रुढ झाल्याने तशी काळजी घेतली जाते. या व्यवसायात किमान ३०० कोटींची उलाढाल होते. कपड्यांची बाजारपेठ व लॉन्ड्री व्यवसायही शिकवणीवर्गांच्या आधाराने उभे आहेत. काही वर्गाचे गणवेश आहेत. कपडा बाजारात शंभर ते दीडशे कोटींची उलाढाल होते.