सातारा: पाचगणी भिलार परिसरातील वनव्यात हजारो एकर दुर्मिळ वनसंपदा आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. मोठ्या प्रमाणात वणवा लागल्याने अनेक वर्षांचा पक्षांचा अधिवास धोक्यात आल्याने अनेक पक्षी घरटे सोडून उडून गेले. यावेळी पक्ष्यांचा किलबिलाट नजरेस पडला. अनेक जीव जंतू सरपटणारे प्राणी या आगीत होरपळले. वणव्याने सर्वत्र धुराचे लोट पसरले होते. पर्यावरणप्रेमींनी वणवा विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, वणव्याची आग मोठी असल्याने प्रयत्न निष्फळ ठरले.

पाचगणी भिलार (ता. महाबळेश्वर) येथे अंजुमन स्कूल परिसरात अज्ञाताने लावलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले होते. धुराचे लोट, सर्वत्र पसरल्याने आगीच्या ज्वाळा भडकल्या होत्या. सर्वत्र आग पसरली होती.

पाचगणी भिलार पाय घाट हा परिसर डोंगरमाथ्यांचा असून, सर्वत्र हजारो एकरावर दुर्मीळ वनसंपदा आहे. औषधी झाडेझुडपे आहेत. अज्ञाताने लावलेल्या वनव्यात हजारो दुर्मीळ झाडेझुडपे वनसंपदा वेली जळून खाक झाल्या. अनेक दुर्मीळ पक्षांचा अधिवास धोक्यात आला. वनवा लावणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. विकेंड असल्याने पर्यटनाकरिता वाहने महाबळेश्वर दिशेने जात होती, तर रस्त्याकडेनेच वणव्याची धग जाणवत होती. या वणव्यामध्ये असंख्य वन्यप्राणी होरपळून गेले, तर हजारो एकर क्षेत्रातील दुर्मीळ वनसंपदा या वणव्यात नष्ट झाली आहे.

आठ दिवसांपूर्वी असाच वणवा तायघट परिसरात भडकला होता. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तो विझविण्याकरिता शर्थीचे प्रयत्न केले होते. मात्र, आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले नव्हते. कारण दुर्गम परिसर असल्याने पटकन सुविधा उपलब्ध होत नाहीत. गेल्या अनेक दिवसांपासून लागत असलेल्या वणव्यांनी हा परिसर काळाकुट्ट झाला आहे. कधी वन संपदेने नटलेले डोंगर राखेत परावर्तित झाल्याने काळेकुट्ट दिसत आहेत. अनेक दुर्मीळ वनस्पती झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या वनव्यात शेकडो वर्षे जुने वृक्ष दुर्मीळ झाडे, वनस्पती, वेली जळून गेली. पाचगणी परिसरात वणवा लागण्याचे प्रकार नित्य घडत आहेत. त्यामुळे पर्यटनप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे.

पाचगणी भिलार महाबळेश्वर परिसरात हजारो एकर दुर्मीळ वनसंपदा आहे. पाचगणी-महाबळेश्वर हा परिसर वनहद्दीत असून, येथील वन संपदेचे रक्षण करणे वन विभागाच्या अखत्यारीत आहे. तरीसुद्धा दरवर्षी बिनधास्त वणवे लावण्याचे प्रकार अज्ञातांकडून होतात. वन विभागाने आपल्या वनसंपदेचे रक्षण करण्याकरिता कठोर पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. सुनील उंबरकर, निसर्गप्रेमी, पाचगणी