विश्वास पवार, लोकसत्ता

वाई : ‘काळूबाईच्या नावाने चांगभलं’च्या जयघोषात मांढरदेव येथील यात्रेला सुरुवात झाली. कडाक्याच्या थंडीत मांढरगडावर मोठ्या संख्येने भाविकांनी पहाटेपासून गर्दी केली आहे. मंदिर आणि परिसर आकर्षक फुलांनी आणि रोषणाईने सजविण्यात आला आहे.

मांढरदेव येथील काळूबाई यात्रा दर वर्षी पौष पौर्णिमेला (शाकंभरी पौर्णिमेला) भरते. यात्रेनिमित्त प्रशासनाकडून आज जिल्हा सत्र न्यायाधीश तथा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व्ही आर जोशी, जिल्हा सत्र न्यायाधीश शिवय्या नंदीमठ व वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार सोनाली मेटकरी, उपविभागीय पोलीस अधिकारी बाळकृष्ण भालचिम, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, अतुल दोशी सुनील व चंद्रकांत मांढरे, पद्माकर पवार, माणिक माने आदी सर्व ट्रस्टी निवासी नायब तहसीलदार वैशाली जायगुडे आदींच्या उपस्थितीत महापूजा करण्यात आली. या वेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा >>> पर्यावरण रक्षणासाठी सयाजी शिंदेंचा विद्यार्थ्यांना धडा

देवस्थान ट्रस्ट व प्रशासनाकडून देवीची सालंकृत पूजा करण्यात आली. देवीला या वेळी सोन्याच्या दागिन्यांनी मढविण्यात आले. कडाक्याच्या थंडीमुळे मांढरगडावर ‘गार गार वारा’ हे गीत भाविक नाचत मोठ्या उत्साहात म्हणत होते. यात्रेनिमित्त बुधवारी रात्री गडावर देवीचा जागर, गोंधळ झाला. यानंतर देवीची रात्री मांढरदेव गावातून ढोल-ताशांच्या गजरात, गुलालाच्या उधळणीत छबिना मिरवणूक काढण्यात आली होती. छबिन्यानंतर आज पहाटे पालखी देवीच्या मंदिराजवळ आली. मंदिरालगतच्या पारावर पालखी आल्यानंतर भाविकांनी दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी केली होती. मुखवटे घातलेल्या असंख्य महिला भाविकांनी गर्दी केली होती. पुरंदर तालुक्यातील बोपगाव येथील मानाची काठी टाळ-मृदंगाच्या गजरात दुपारी मांढरदेवी येथे पोहोचली. सातारा प्रशासनाकडून यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे.

प्रतिबंधात्मक आदेश

प्रतिबंधात्मक आदेशानुसार मांढरदेव परिसरामध्ये यात्रा कालावधीमध्ये मांढरदेव मंदिर परिसरामध्ये नारळ फोडणे, तेल वाहण्यास पूर्ण बंदी करण्यात आलेली आहे. पशुहत्या करण्यास मनाई करण्यात आली आहे. कोंबड्या, बकऱ्या, बोकड इत्यादी प्राण्यांचा बळी देण्यास, हत्या करण्यास, तसेच वाहनातून यात्रेच्या ठिकाणी घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. मांढरदेव परिसरात वाद्य आणण्यास व वाजविण्यास, परिसरातील झाडांवर खिळे ठोकण्यास, लिंबू टाकणे, काळ्या बाहुल्या, बिबे, भानामती करणे, करणी करण्यास प्रतिबंध करण्यास आला आहे. तसेच परिसरात दारू, मद्य जवळ बाळगणे, वाहतूक करणे, विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

Story img Loader