कृष्णा नदीमध्ये दूषित पाण्यामुळे कोल्हापूर मार्गावरील अंकली येथे हजारो मासे मृत्युमुखी पडले असून मृत मासे गोळा करण्यासाठी शुक्रवारी नागरिकांची झुंबड उडाली होती. नदीपात्रात गेल्या काही दिवसापासून औद्योगिक वसाहत, साखर कारखान्यातून मळी मिश्रित पाणी विनाप्रक्रिया सोडले जात असल्यामुळे जलचर संकटात आल्याचे बोलले जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 कोल्हापूर मार्गावर सांगली शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर कृष्णा नदीचे पात्र आहे. हरिपूर येथे वारणा नदीचा संगम झाल्यानंतर हे ठिकाण असून आज सकाळी नदीकाठाला मृत मासे येत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. नदीपात्रामध्ये मृत माशांचा खच पडला होता. मृत मासे झुंडीने काठाला येत असल्याचे दिसून आले. यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

कृष्णा नदीपात्रात गेल्या काही दिवसापासून औद्योगिक वसाहत, साखर कारखान्यातून  मळी मिश्रित पाणी विना प्रक्रिया सोडले जात असल्यामुळे आणि नदीतील वाहते पाणी कमी झाल्यामुळे नदीतील जलचर संकटात आले आहे. नदीतील पाणी प्रदूषित झाल्याने मासे मृत होत असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान मृत मासे गोळा करण्यासाठी अंकलीच्या कृष्णा नदी येथे नागरिकांची झुंबड उडाली आहे, लहान माशापासून आठ-दहा किलो वजनाचे मासे देखील या ठिकाणी आता मृत झाल्याचे आढळून आले. मोठे मासे आढळल्याने खव्वयांनी मासे गोळा करण्यासाठी गर्दी केली होती.

दरम्यान, सांगलीतील प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी नवनाथ अवताडे यांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले, की नदी प्रदूषित होण्यामागील कारणांचा शोध घेण्यात येत आहे. अंकली पुलाजवळील व सांगलीमध्ये शेरी नाला ज्या ठिकाणी नदीला मिळतो त्या ठिकाणच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून पाणी प्रदूषण होण्यामागील निश्चित कारण येत्या एक दोन दिवसात स्पष्ट होणार आहे. यानंतर संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल. दरम्यान, अंकली पुलाजवळ काही मृत मासेही मत्स्यविकास मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून ताब्यात घेण्यात आले असून मासे मृत होण्यामागील कारण या तपासणीतून स्पष्ट होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thousands of fish dead in krishna river sangli amy