अवकाळी पाऊस तसेच गारपिटीचा पारनेर तालुक्यास बुधवारी सायंकाळी तसेच रात्री पुन्हा तडाखा बसला. या वेळी सांगवी सूर्या, कोहकडी, राळेगणथेरपाळ, माझपूर, जवळा, गुणौरे तसेच गाडिलगाव या गावांना गारपिटीचा जबर फटका बसला असून पिके तसेच फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. पारनेर, सुपा, वाडेगव्हाण, वडझिरे, पळशी, निघोज, राळेगणसिद्घी, टाकळीढोकेश्वर तसेच भाळवणीस मुसळधार पावसाने झोडपले.
पारनेरला सर्वाधिक २३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पारनेरमध्ये बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आलेल्या हजारो कांदा गोण्या पावसाने भिजून व्यापा-यांचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले आहे. बुधवारी सायंकाळी तालुक्याच्या विविध भागांत मुसळधार पावसाला प्रारंभ झाला. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे पारनेर बाजार समितीत लिलावानंतर उघडय़ावर असलेल्या हजारो कांदा गोण्या भिजल्या. गेल्या काही दिवसांत कांदा गोण्या भिजत असल्याचे व्यापारी मोठय़ा आर्थिक संकटात सापडले आहेत.
कुकडीपट्टय़ातील जवळा परिसर आतापर्यंत गारपिटीच्या तडाख्यातून वाचला होता. बुधवारी मात्र गारपिटीची वक्रदृष्टी या भागाकडेही वळाली. येथील केळी, डाळिंबाच्या बागांसह कांदा, टोमॅटो तसेच इतर पिकांची पुरती वाताहत झाली. या भागात अत्याधुनिक शेतीसाठी उभारण्यात आलेले शेडनेटही उद्ध्वस्त झाले आहेत.