खासदार डॉ. पद्मसिंह पाटील पराभूत झाल्यास गोळ्या घालून ठार करू, अशी धमकी दिल्याप्रकरणी लोहारा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची चौकशी करण्यात आल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता ‘डॉक्टर हरल्यास तुझा पवनराजे करू,’ अशा धमकीचे पत्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पाठविण्यात आले आहे. एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष तथा खासदार डॉ. पाटील यांचे मेव्हणे जीवन गोरे यांच्या जुन्या लेटरहेडचा वापर करून ही धमकी देण्यात आली. या प्रकारामुळे पुन्हा खळबळ उडाली.
खासदार डॉ. पाटील व हजारे यांनी नेहमीच एकमेकांच्या विरोधात प्रक्षोभक विधाने केली आहेत. लोकसभा निवडणूक मतदानाच्या पूर्वसंध्येला डॉ. पाटील पराभूत झाल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी लोहारा तालुक्यातील पांढरी येथील भीमराव मुळे व अन्य एकास ताब्यात घेऊन चौकशी केली. मुळे हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचे सांगत असून, दारूच्या नशेत आपण हे कृत्य केले असल्याचे त्याने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले होते.
या प्रकरणाचा छडा अजून लागला नाही, तोच हजारेंना पुन्हा धमकी देण्यात आली आहे. ‘डॉक्टर हरल्यास तुझा पवनराजे करू,’ असे या धमकीत म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते तथा एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष गोरे यांच्या जुन्या लेटरहेडचा या धमकीसाठी वापर केला आहे. गोरे हे जि. प.चे अध्यक्ष असतानाचे हे लेटरहेड आहे. त्यावर हजारे यांचा एकेरी उल्लेख करीत खालच्या पातळीवर जाऊन धमकावले आहे. ‘डॉक्टरच्या विरोधात तू लय बकलास. कुत्र्याच्या भुंकण्यानं काही होणार नाही. डॉक्टर तर निवडून येणारच हाय. पण राणादादाबी विधानसभेत जाणार हाय. तुझ्या भुकल्यानं चुकून डॉक्टर पडला, तर महिनाभरात तुझा पवनराजे आम्ही करू हे लक्षात ठेव,’ अशी भाषा या पत्रात आहे.
या प्रकरणी हजारे यांचे स्वीय सहायक श्याम पठारे यांनी भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासच्या वतीने पारनेर पोलीस ठाण्यात शनिवारी तक्रार दिली. न्या. पी. बी. सावंत यांच्या चौकशीत खासदार डॉ. पाटील भ्रष्ट असल्याचे म्हटले, तसेच डॉ. पाटील यांनी हजारे यांच्या हत्येची सुपारी देण्याचा प्रयत्न केल्याचे पवनराजे हत्याप्रकरणातील आरोपी पारसमल जैनच्या जबाबावरून स्पष्ट झाले आहे. या पाश्र्वभूमीवर उस्मानाबादमधूनच ९ एप्रिल, १४ एप्रिल रोजी दूरध्वनीवरून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. आता २९ एप्रिलला पुन्हा संस्थेच्या कार्यालयात टपालाद्वारे धमकीचे पत्र मिळाले. या पत्राच्या पाकिटावर हस्ताक्षरात अण्णांचे नाव, पत्ता लिहिला असून डाव्या बाजूस मेंबर ऑफ पार्लमेंट (लोकसभा) असे छापले आहे. या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून दोषींवर कडक कारवाई करावी, असे पठारे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी १६ मेनंतर अण्णा हजारे आपली अधिकृत भूमिका जाहीर करणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार या प्रकरणी ते न्यायालयात जाणार असून आंदोलनाचा पवित्राही घेणार असल्याचे समजते. दरम्यान, सार्वजनिक वाहतूक विषयासंदर्भात अमेरिकेच्या अभ्यास दौऱ्यावर अध्यक्ष गोरे सध्या गेले असून त्यांची या बाबतची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.