किनवट रेल्वेस्थानक व कृष्णा एक्स्प्रेसमध्ये बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले; पण त्याने अजून कबुली दिली नसल्याचे सांगण्यात आले.
गेल्या आठवडय़ात नांदेड रेल्वेस्थानकावर बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी माहूर तालुक्यातील तरुणाने दिली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच बुधवारी रात्री आठच्या सुमारास नांदेड येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात एकाने किनवट रेल्वेस्थानक, तसेच कृष्णा एक्स्प्रेस बॉम्बने उडविण्याची धमकी दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नांदेड पोलिसांनी तत्काळ किनवट रेल्वेस्थानकावर बॉम्बशोधक नाशक पथक पाठवले. मात्र, धमकी येईपर्यंत तिरुपतीकडे जाणाऱ्या कृष्णा एक्स्प्रेसने किनवट रेल्वेस्थानक सोडले होते.
किनवट रेल्वेस्थानकाची तपासणी होत असताना कृष्णा एक्स्प्रेस मुदखेड रेल्वेस्थानकावर थांबवण्यात आली. बॉम्बशोधक व नाशक पथकाने संपूर्ण रेल्वेची तपासणी केल्यानंतर सर्वानी सुटकेचा नि:श्वास टाकला. एकाच मोबाइलमध्ये दोन सीमकार्ड आहेत आणि याच मोबाइलद्वारे धमकी आल्याचे स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी माहूर तालुक्यातील सिंदखेडजवळील वसंतराम तांडा येथील तरुणाला ताब्यात घेतले. या प्रकरणात गंगाखेड तालुक्यातील मार्गलवाड येथील तरुणाचा पोलीस शोध घेत आहेत. ज्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले त्याने आपला मोबाइल दोन दिवसांपूर्वी हरवल्याची माहिती पोलिसांना दिली. या माहितीत किती तथ्य, याचा पोलीस शोध घेत आहेत.
या प्रकारानंतर दहशतवादविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली. अशा प्रकारच्या सततच्या धमक्यांमुळे पोलीस यंत्रणेसह प्रवाशीही वैतागले आहेत. तब्बल दोन तासांच्या तपासणीनंतर कृष्णा एक्स्प्रेस हैदराबादकडे रवाना झाली.

Story img Loader