पुणे : राज्यात कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या वर्षभरात डेंग्यूमुळे २६ जणांचा मृत्यू झाला आहे. याचवेळी हिवतापाने २० जण दगावले आहेत. राज्यात हिवताप आणि डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण मुंबई महापालिकेच्या हद्दीत आढळून आले आहेत. डेंग्यूचे सर्वाधिक मृत्यू मुंबईत तर हिवतापाचे सर्वाधिक मृत्यू गडचिरोलीत झाले आहेत.
राज्यात या वर्षात २१ नोव्हेंबरपर्यंत हिवतापाचे १८ हजार ४७७ रुग्ण आढळले असून, त्यातील २० जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षी हिवतापाचे १६ हजार १५९ रुग्ण आढळले होते आणि १९ जणांचा मृत्यू झाला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत रुग्णसंख्येत यंदा वाढ दिसून येत आहे. राज्यात डेंग्यूचे एकूण १८ हजार १५६ रुग्ण आढळले असून, त्यातील २६ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षी डेंग्यूचे १९ हजार ३४ रुग्ण आढळले होते आणि त्यातील ५५ जणांचा मृत्यू झाला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत रुग्णसंख्येत फारसा बदल झालेला नसल तरी रुग्ण मृत्यूमध्ये घट झाली आहे, अशी माहिती आरोग्य सहसंचालिका डॉ. बबिता कमलापूरकर यांनी दिली.
हेही वाचा – पिंपरी- चिंचवड : लिव्ह इन रिलेशनमधील प्रेयसीची हत्या; मुलाला सोडलं आळंदीत बेवारस
राज्यात हिवतापाचे सर्वाधिक ७ हजार ४३ रुग्ण मुंबई महापालिकेच्या हद्दीत आढळून आले आहेत. त्याखालोखाल गडचिरोली जिल्हा ६ हजार २३५, पनवेल महापालिका ८६७, ठाणे महापालिका ६८८, चंद्रपूर जिल्हा ५०३ आणि रायगड ४६७ अशी रुग्णसंख्या आहे. हिवतापाचे सर्वाधिक ११ मृत्यू गडचिरोलीत झाले असून, त्याखालोखाल मुंबईत ५ मृत्यू झाले आहेत. डेंग्यूचे सर्वाधिक ५ हजार ४३५ रुग्ण मुंबईत आढळले असून, ५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे, असे डॉ. कमलापूरकर यांनी सांगितले.
चिकुनगुन्याची रुग्णसंख्या तिप्पट
गेल्या वर्षी राज्यात चिकुनगुन्याचे १ हजार ७०२ रुग्ण आढळले होते. यंदा २१ नोव्हेंबरपर्यंत चिकुनगुन्याचे ५ हजार ३६० रुग्ण आढळले आहेत. चिकुनगुन्याच्या रुग्णसंख्येत तिपटीहून अधिक वाढ झाल्याचे समोर आले आहे. मात्र चिकुनगुन्यामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडे नाही.
हेही वाचा – पुणे : मोटारीच्या धडकेत पाळीव श्वानाचा मृत्यू, स्वारगेट भागातील घटना
कीटकजन्य आजारांचा धोका
हिवताप रुग्ण – १८,४७७
हिवताप मृत्यू – २०
डेंग्यू रुग्ण – १८,१५६
डेंग्यू मृत्यू – २६
चिकुनगुन्या रुग्ण – ५,३६०
चिकुनगुन्या मृत्यू – ०