अकोला-पूर्णा सुपरफास्ट रेल्वेगाडी आणि अकोल्याचे भाजप खासदार संजय धोत्रे यांचे घर बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार २६ जुलैला रात्री घडला.
मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला या धमकीचा फोन आला होता. याची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांसह अकोला पोलिसांनी मंगळवारी रात्री १० वाजून ४० मिनिटपर्यंत अकोला-पूर्णा रेल्वे गाडीची संपूर्ण तपासणी केली. खासदारांच्या निवासस्थानी बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. पोलिसांना कुठलेही संशयास्पद साहित्य किंवा व्यक्ती आढळून आले नाहीत. बॉम्ब ठेवल्याची अफवाच असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, विशेष पथक, श्वान पथक, बॉम्ब पथक, जीआरपी, आरपीएफ पथकासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अकोला रेल्वे स्थानकावर धाव घेऊन फलाट क्रमांक पाचवर उभी असलेल्या अकोला-पूर्णा सुपरफास्ट पॅसेंजरची तपासणी केली. रेल्वेच्या प्रवाशांची कसून चौकशीसह तपासणी करण्यात आली. अर्धा तास शोध मोहीम चालली. श्वान पथकाद्वारे रेल्वेच्या सर्व डब्यांची तपासणी झाली. रेल्वेमध्ये बसलेल्या प्रवाशांचे छायाचित्रे काढण्यात आली. या मोहिमेत कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती आढळून आले नाहीत. त्यानंतर रेल्वे आपल्या मार्गाने रवाना झाली. हा निनावी फोन कोणी केला याचा शोध घेतला जात आहे.