ऐन लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पद्मसिंह पाटील यांच्या विरोधात उस्मानाबाद जिल्ह्य़ात पत्रके वाटणे बंद करा, ते पराभूत झाले तर परिणाम चांगले होणार नाहीत, अण्णा व त्यांच्या सहका-यांकडे पाहून घेतले जाईल अशी धमकी  मोबाइलवरून देऊन वारंवार अपशब्द वापरल्याचा गुन्हा पारनेर पोलिस ठाण्यात अज्ञात इसमाविरूद्घ दाखल करण्यात आला आहे.
भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे स्वयंसेवक श्यामकुमार पठाडे यांनी अज्ञात इसमाविरूद्घ दिलेल्या फिर्यादीवरून पारनेरचे पोलिस निरीक्षक शरद जांभळे यांनी गुन्हा दाखल केला आहे. ९५२७६९५३९७ या मोबाइल क्रमांकावरून ९ एप्रिल रोजी भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाच्या कार्यालयातील दूरध्वनीवर फोन आला. स्वयंसेवक अमोल झेंडे यांनी तो घेतला असता पद्मसिंह पाटील यांचे समर्थन करीत अज्ञात इसमाने अण्णा हजारे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. झेंडे यांनी त्यास नाव विचारले असता त्याने नाव सांगणे टाळले. झेंडे यांनी ही बाब कार्यालयातील इतर सहका-यांना सांगितल्यानंतर सर्वानुमते या फोनकडे दुर्लक्ष करण्याचा निर्णय घेण्यात आला.
याच क्रमांकावरून परवा (सोमवारी) दुपारी दोनच्या सुमारास पुन्हा फोन आला. पठाडे यांनीच तो घेतला. उस्मानाबाद जिल्हयात हजारे यांच्या कार्यकर्त्यांकडून सुरू असलेल्या मतदार जनजागृतीचा राग मनात धरून या इसमाने हजारे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. जिल्हयात पत्रके वाटणे बंद करा, पद्मसिंह पराभूत झाले तर परिणाम चांगले होणार नाहीत. अण्णा व त्यांच्या कार्यकर्त्यांकडे पाहून घेऊ अशी धमकी देण्यात आली. पठाडे यांनी या इसमास नाव विचारण्याचा वारंवार प्रयत्न केला, परंतु तो काहीही ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हता. वारंवार हजारे यांना अपशब्द वापरले जात होते.
हजारे यांना या गोष्टीची कल्पना देण्यात आली. या फोनमुळे हजारे यांच्या जीवितास धोका असल्याची जाणीव झाल्याने आपण अस्वस्थ झाल्याचे पठाडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या मोबाइल नंबरची चौकशी करून संबंधितांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
लोकसभेत भ्रष्ट व कलंकित प्रतिनिधी  जाऊ नयेत यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे जनजागृती करीत असून त्याचाच एक भाग म्हणून उस्मानाबाद जिल्हयातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार पद्मसिंह पाटील यांच्या भ्रष्टाचार, कुशासन तसेच गैरकारभाराबाबात उस्मानाबादच्या निवडणूक निर्णय अधिका-यांच्या परवानगीने हजारे यांनी एक पत्रक प्रसिद्घ केले असून ते हजारे यांचे कार्यकर्ते उस्मानाबाद मतदारसंघात गावोगाव ते पत्रक वाटत आहेत. हजारे यांच्या तक्रारीवरून शासनाने न्यायमूर्ती पी. बी. सावंत आयोगाची स्थापना करून चौकशी करण्यात आली. त्यात पद्मसिंह पाटील दोषी आढळले. त्याचा राग मनात धरून हजारे यांच्या हत्येची सुपारी देण्यात आली होती. त्याचा संदर्भही या फिर्यादीत देण्यात आला आहे.