अलिबाग – होळीच्या वादातून रत्‍नागिरी जिल्‍हयातील म्‍हाप्रळ येथे एकाची हत्या करण्यात आली होती. त्याचे प्रेत गोणीत भरून रायगड जिल्ह्यात टाकण्यात आले होते. मात्र रायगड पोलीसांनी तपासाची चक्र फिरवून आरोपींना गाठलेच. तीन आरोपींना पोलीसांनी जेरबंद केले असून, संतोष साबळे,विशाल देवरुखकर आणि श्यामलाल मौर्य अशी तिघांची नावे आहेत.

म्‍हसळा तालुक्‍यातील तोराडी बंडवाडी इथं रस्‍त्‍यालगत पडलेल्‍या गोणीतून दुर्गंधी येवू लागली. मृतदेह कुजलेल्‍या अवस्‍थेत असल्‍याच्‍या संशयाने स्‍थानिकांनी याची माहिती म्‍हसळा पोलीसांना दिली. म्‍हसळा पोलीसांनी घटनास्‍थळी येवून पाहणी केली असता असता गोणीमध्‍ये कुजलेल्‍या अवस्‍थेतील पुरूषाचे प्रेत सापडले. प्रेताची अवस्‍था पाहता त्‍याची ओळख पटवणे केवळ मुश्किल होते.

प्रेताच्‍या खिशातील डायरीवर एकमेव नंबर लिहिलेला होता. हाच नंबर पोलीसांना आरोपींपर्यंत पोहोचण्‍यासाठी महत्‍वाचा दुवा ठरला हा नंबर श्रीवर्धन तालुक्‍यातील कोंडे पंचतन येथील लेबर सप्‍लायर संतोष साबळे याचा एकमेव फोननंबर लिहिलेला होता. साबळे हे बांधकामासाठी कामगार पुरवण्‍याचे काम करतात.

म्‍हसळा पोलीसांनी संतोष साबळे याला फोन करून बोलावून घेतले. त्‍याची चौकशी केली असता त्‍याने उडवाउडवीची उत्‍तरे दिली. त्‍यामुळे म्‍हसळा पोलीसांचा संशय बळावला. त्‍यानंतर म्‍हसळा पोलीसांनी संतोष साबळे याच्‍या म्‍हाप्रळ येथील साईटवरील कामगारांकडे चौकशी केली असता होळीच्‍या वेळी झालेल्‍या वादाची माहिती मिळाली.

पोलीसांनी म्‍हाप्रळ येथून विशाल देवरूखकर आणि श्‍यामलाल मौर्य यांना ताब्‍यात घेतले. त्‍यांची कसून चौकशी केली असता आपणच होळीच्‍या दिवशी झालेल्‍या वादातून लोखंडी रॉडने हल्ला करून खून केल्‍याची कबुली दिली. खून केल्‍यानंतर दोघांनी याची माहिती संतोष साबळे याला दिली. साबळे यांनी प्रेत गोणीत भरून रायगड जिल्‍हयाच्‍या हद्दीत टाकण्‍याचा सल्‍ला दिल्‍याची माहिती आरोपींनी पोलीसांना दिली. बादशहा असे मृत व्‍यक्‍तीचे नाव आहे.

पोलीसांनी याप्रकरणी संतोष साबळे (रा. कोंडे पंचतन) ,विशाल देवरुखकर (रा. गुहागर) आणि श्यामलाल मौर्य (रा. उत्‍तर प्रदेश) या तिघांना अटक केली. गुन्‍हयाची नोंद झाल्‍यानंतर अवघ्‍या १२ तासात उलगडा करून आरोपींना अटक करण्‍यात पोलीसांना यश आले. उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे यांच्‍या मार्गदर्शनाखाली , सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप काहाले, पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर एडवले त्‍यांचे सहकारी  संतोष चव्हाण , सागर चितारे, विघ्ने, स्वप्नील निळेकर यांनी ही कामगिरी पार पाडली.