धवल कुलकर्णी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तसं तर त्या तिघी म्हणजे बहिणी, अगदी तिळ्या म्हणाव्यात इतक्या दिसायला सारख्या. पण गंमत अशी ही त्या तिघांमधल्या नातं हे जवळजवळ दोन हजार वर्ष जुनं. तरी त्या एकमेकांपासून हजारो किलोमीटर लांब आहेत…

चक्रावलात?

या कथेची सुरुवात होते महाराष्ट्रातल्या तगर नावाच्या प्राचीन नगरात. तगर म्हणजे आजचे उस्मानाबाद जिल्ह्यातले तेर. आज जरी हा प्रदेश काहीसा शुष्क व दुष्काळग्रस्त असला तरीसुद्धा प्राचीन काळात तगर हे सातवाहनांच्या काळातील मोठी व्यापारी पेठ.

या तगर नगरीचा उल्लेख चिनी प्रवासी ह्युएन-त्सांग याच्या लेखनात सापडतो. ही नगरी इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात ते इसवी सनाच्या तिसऱ्या शतकापर्यंत सातवाहन पूर्व, सातवाहन, उत्तर सातवाहन ते वाकाटकांच्या कालखंडापर्यंत वसली होती. सातवाहनांची राजधानी म्हणजे आजचे प्रतिष्ठान किंवा पैठण. सातवाहनांच्या काळात तर तगर उन्नतीच्या अत्युच्च शिखरावर होते. पण नंतरच्या काळात बदललेले हवामान, शुष्क वातावरण व दुष्काळ यामुळे हळूहळू ही संस्कृती लयाला गेली. सातवाहनांच्या काळात तगरचा संबंध हा थेट रोमन साम्राज्याशी होता. भारताला रोमसोबत जोडणाऱ्या व्यापारी मार्गामध्ये उदाहरणार्थ मच्छलीपटनम् विनुकोंडा कल्याण नासिक सुरत भरूच इत्यादीमध्ये तगर एक महत्त्वाचं स्थान होतं.

अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पुरातत्व शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर माया पाटील यांनी सांगितले की, 1950 ते 60 च्या दरम्यान काही स्थानिक गावकऱ्यांना ही हस्तिदंती बाहुली सापडली. त्या गावकऱ्यांनी तेर गावातले एक हौशी संकलक रामलिंग अप्पा लामतुरे त्यांना साधारणपणे 12.50 सेंटीमीटरची ती बाहुली दिली.

“ती बाहुली हस्तिदंताची आहे. तिच्या डोक्यावर एक छिद्र आहे. ते कदाचित आरसा लावण्यासाठी असावे. असा अंदाज आहे की, तिची निर्मिती साधारणपणे इसवी सनाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या शतकात झाली असावी. विशेष म्हणजे, तशाच दोन बाहुल्या अन्य ठिकाणी सापडले आहेत. एक आहे ती रोमच्या पॉम्पी म्युझियममध्ये, तर दुसरी सापडली ती जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये (भोकरदनला सातवाहनांच्या काळात भोगवर्धन असे म्हणत. तेसुद्धा व्यापारी मार्गावरील एक महत्त्वाचे ठाणे होते). या तिन्ही बाहुल्या तशा दिसायला सारख्या आहेत, पण पॉम्पी व भोकरधन मधल्या भावल्यामध्ये हे साम्य काहीसे अधिक आहे.

काय आहेत या नव्या बाहुलीचे वैशिष्ट्ये?
तेरमध्ये सापडलेल्या बाहुली बद्दल सांगायचं झालं तर तिचे डोळे खूप वैशिष्ट्यपूर्ण आहेत. बाहुली मध्ये कुठलाही रंग वापरण्यात आला नसला तरीसुद्धा तिचे कोरलेले डोळे घारे दिसतात. तिने नऊवारी नेसली असून मागच्या बाजूला तिच्या काष्टाचा स्वकाच्च (साडीचा मागे खोचण्याचा भाग) आहे. तिने वर उत्तरिय परिधान केला आहे. गळ्यात माळा आहेत व केशरचनासुद्धा छान व काहीशी वैशिष्ट्यपूर्ण आहे. वर उचललेल्या उजव्या हातात बांगड्या आहेत. तिच्या केसाची सेटिंग एखाद्या पंख्याप्रमाणे असून, खाली वेण्या सोडलेल्या आहेत. त्या बाहुलीच्या कपाळावर बिंदी आहे आणि गळ्यात लांब हार. पॉम्पी व भोकरदन इथल्या बाहुल्यांमध्ये काहीसा फरक असा की त्यांच्या पायाजवळ काही छोटी माणस आहेत. ते बहुदा त्यांचे सेवक असावेत व त्यांना मेकअपचे साहित्य देत असावेत,” असे पाटील यांनी सांगितले.

सध्या ही बाहुली आहे तरी कोणाकडे?
तेरच्या रामलिंग अप्पा लामतुरे वस्तुसंग्रहालयाचे क्युरेटर अमोल गोटे यांनी अशी माहिती दिली की, ही दुर्मिळ प्राचीन व वैशिष्ट्यपूर्ण बाहुली ही रामलिंग अप्पा लामतुरे यांचे नातू रेवप्पा लामतुरे यांच्या वैयक्तिक संग्रहातली आहे. सध्या तेरी येथे तगर महोत्सव सुरू असून ती बाहुली पहिल्यांदाच जाहीर प्रदर्शनासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. लोकांना ही बाहुली तीन दिवस म्हणजे, नोव्हेंबर 21 ते 23 रोजी वस्तुसंग्रहालयात पाहता येईल. “या बाहुलीला तगर लक्ष्मी म्हणतात तर, पॉम्पीच्या बाहुलीला भारतीय लक्ष्मी. या बाहुल्या प्राचीन काळातल्या फार महत्त्वाचा वारसा आहेत. त्यांच्यावरची कलाकुसर ही फार बहुमूल्य आहे,” अशी माहिती गोटे यांनी दिली.