राहाता पोलिस ठाण्याच्या हद्दीत खून व जबरी चो-यांच्या गुन्ह्यातील फरार आरोपी दीपक पोकळे, अक्षय दाभाडे व सुभाष पवार यांना राहाता व लोणी पोलिसांनी संयुक्त कारवाईत पाठलाग करून पकडले. हे तीनही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांनी पोलिसांची झोप उडवली होती. पोलिसांच्या या कारवाईचे तालुक्यात व पोलिस दलातूनही स्वागत होत आहे.
तालुक्यातील साकुरी येथील दिनेश बाबासाहेब भडांगे या तरुणाचा दीपक पोकळे, संदीप काकडे, विकी चावरे, सागर गायकवाड, गणेश बनसोडे, गोंडय़ा थोरात या पाच आरोपींनी तीक्ष्ण हत्याराने गाळा चिरुन निर्घृण खून केला होता. या घटनेपासून दीपक पोकळे हा फरार होता. अक्षय दाभाडे याने दि. १६ मे २०१४ ला साकुरी हद्दीत मध्यप्रदेशातील मजूर सोनीसिंह पहेलाद यादव याचा तीक्ष्ण हत्याराने खून केला होता. तेव्हापासून तोही फरार होता.
हे सर्व आरोपी लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आल्याची माहिती राहाता पोलिसांना मिळाली होती. त्यांनी लोणी पोलिसांच्या मदतीने दीपक अंबादास पोकळे, अक्षय अप्पासाहेब दाभाडे व सुभाष ज्ञानेश्वर पवार यांचा पद्मश्री विखे पाटील इंजिनिअरिंग कॉलेजनजीक पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला असता हे आरोपी शेजारील उसाच्या शेतात पळाले, मात्र पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून त्यांना पकडले. राहात्याचे पोलिस निरीक्षक निरीक्षक सुरेश बेंद्रे, लोणीचे सहायक निरीक्षक देवीदास पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. जिल्हा पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे व अप्पर पोलीस अधीक्षक सुनीता साळुंके-ठाकरे यांनी सर्वाचे अभिनंदन केले.
तीन सराईत आरोपींना पाठलाग करून अटक
राहाता पोलिस ठाण्याच्या हद्दीत खून व जबरी चो-यांच्या गुन्ह्यातील फरार आरोपी दीपक पोकळे, अक्षय दाभाडे व सुभाष पवार यांना राहाता व लोणी पोलिसांनी संयुक्त कारवाईत पाठलाग करून पकडले.
First published on: 02-07-2014 at 03:20 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three arrant accused arrested