शिराळा तालुक्यातील निगडी गावातील वस्तीवर दरोडा टाकून महिलेचा खून केल्या प्रकरणी तिघांच्या टोळीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिक्षक बसवराज तेली यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत दिली. दरोडेखोरांकडून चोरीत लंपास केलेले तीन लाखाचे सोन्याचे दागिनेही हस्तगत करण्यात आले आहेत.
याबाबत माहिती अशी की, निगडी गावामध्ये वस्तीवर असलेल्या सदाशिव साळुंखे यांच्या वस्तीवर १७ जानेवारी रोजी अज्ञात टोळीने दरोडा टाकून हिराबाई साळुंखे यांच्या अंगावरील सहा तोळे सोन्याचे दागिने लंपास केले होते. यावेळी दरोडेखोरांनी धारदार हत्याराने वार केल्याने साळुंखे पती-पत्नी जखमी झाले होते. उपचार सुरू असताना महिलेचा रूग्णालयात मृत्यू झाला होता.
हेही वाचा >>> …आणि वाघाचा अपघाती मृत्यू थोडक्यात टळला
या दरोड्याचा कसून तपास करण्याचे निर्देश आदेश देण्यात आले होते. पोलीस निरीक्षक सतीश शिंंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक कारागृहातून बाहेर आलेले संशयितावर नजर ठेवून असताना पोलीस कर्मचारी सुनील चौधरी, उदयसिंह माळी, संकेत कानडे यांना संशयिताबाबत माहिती मिळाली. त्यांनी इस्लामपूरजवळ लक्ष्मी फाटा येथे मगर्या अशोक उर्फ अजितबाबा काळे (वय 19 रा. येवलेवाडी) तक्षद उर्फ स्वप्नील पप्पा काळे (वय २६ रा. कार्वे) आणि गोपी उर्फ टावटाव त्रिशूल उर्फ त्रिशा काळे (वय १९ रा.ऐतवड) या तिघांना अटक केली. या संशयितांची झडती घेतली असता निगडी येथून दरोडा टाकून लंपास केलेले सहा तोळे वजनाचे दागिने, १० हजार ६०० रूपये रोख मिळाले. या टोळीने कासेगाव, आष्टा व इस्लामपूरमध्येही जबरी चोर्या केल्याची कबुली दिली असल्याचे अधिक्षक तेली यांनी सांगितले. दरोड्यासाठी वापरण्यात आलेली दुचाकीही पोलीसांनी हस्तगत केली आहे.