रेल्वेतील नोकरीचे आमिष दाखवून सांगली, कोल्हापूरसह बेळगाव जिल्ह्यातील तरुणांना बारा लाख रुपयांना फसविल्याप्रकरणी तीन भामटय़ांना मिरज पोलिसांनी अटक केली आहे. तरुणांना नोकरीसाठी आमिष दाखवून लुबाडणूक करणारी मोठी साखळी कार्यरत असावी असा पोलिसांना संशय असून या टोळीने तरुणांना रेल्वे बोर्डाची बोगस पत्रेही दिली आहेत.
पोलीस उपअधीक्षक बजरंग बनसोडे यांच्याकडे नोकरीचे आमिष दाखवून आíथक लुबाडणूक झाल्याची तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची चौकशी करून सचिन चौगुले (वय ३७, रा. सांगली) संभाजी भंडारे (वय ४९, रा. कुकटोळी, ता. कवठेमहांकाळ) व महीपती साळुंखे (वय ६२, रा. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) यांना अटक करण्यात आली. या टोळीने सांगली, कोल्हापूर व बेळगाव जिल्ह्यातील ५ जणांची सुमारे १२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे निदर्शनास आले आहे. या तिघांच्या साखळीत आणखी काही आरोपींचा समावेश असल्याचा पोलिसांचा संशय असून त्यांचा शोध सुरू असल्याचे उपअधीक्षक बनसोडे यांनी सांगितले.

Story img Loader