कमी पावसामुळे आर्थिक नियोजन बिघडल्याने शेतकरी अस्वस्थ झाले असून खान्देशातील तीन शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करण्यामागील कारणही हेच सांगितले जात आहे.
धुळे तालुक्यातील वार येथील हिरामण देविदास पाटील (५५), बेहेडचे देविदास तुळशीराम पाटील (३५) तर जळगाव जिल्ह्य़ाच्या अमळनेर तालुक्यातील सोनखंडी येथील किरण महारू पाटील (४०) या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमुळे दुष्काळी परिस्थितीचे संकट कोणते वळण घेऊ शकते, याचा अंदाज प्रशासनाला येऊ लागला आहे. वार येथील हिरामण पाटील हे तीन दिवसांपूर्वी घरातून निघून गेले होते. शनिवारी दुपारी एकच्या सुमारास सांजोरी शिवारात एका विहिरीजवळ काही मुले खेळत असताना त्यातील एकास पाण्यात मृतदेह तरंगताना दिसला. ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्याची ओळख पटली. पाटील हे कर्जबाजारी असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांकडून देण्यात आली. दुष्काळामुळे कोणतेच उत्पन्न हाती येण्याचे चिन्ह नसल्याने त्यांनी आत्महत्या केली असण्याचा अंदाज नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.

Story img Loader