सोलापूर : ऊसतोड मजुरांची ट्रॅक्टर ट्रॉली शेतातील विहिरीत कोसळून ऊसतोड मजुरांची तीन बालके मृत्युमुखी पडली. माढा तालुक्यातील शिंगेवाडी शिवारात सकाळी ही दुर्घटना घडली. अपघातग्रस्त ट्रॅक्टर नेहमीच्या चालकाऐवजी ऊसतोड मजूर टोळीचा मुकादम चालवत होता. त्याच्यावर कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> मोठी बातमी! सत्तास्थापनेचा तिढा सुटणार? देवेंद्र फडणवीस तातडीने ‘वर्षा’वर एकनाथ शिंदेंच्या भेटीला, बैठकीत काय निर्णय होणार?

अपघातातील तिन्ही मुलांचे पालक नंदूरबार जिल्ह्यातील आहेत. रिंकू सुकलाल वसावी (वय ३), नीतेश शिवा वसावी (वय ३) आणि आरव पाडवी (वय ४) अशी मृत बालकांची नावे आहेत. हयगयीने, अविचाराने, धोकादायकरीत्या ट्रॅक्टर चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी ऊसतोड मजुरांचा मुकादम खिमजी जालम्या तडवी याच्याविरुद्ध ऊसतोड मजूर सुखलाल करपा वसावी (रा. पिंपळवाडी, ता. धडगाव, जि. नंदूरबार) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. अपघात घडताच खिमजी तडवी याने स्वत:चा जीव वाचवत पलायन केले. सुखलाल वसावी हे शिंगेवाडी शिवारात ऊसतोड मजूर म्हणून आले होते.

हेही वाचा >>> मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात पाच वाहनांचा अपघात; घरदा कंपनीचे वीस कामगार जखमी

ऊसतोडीसाठी ट्रॅक्टरला (एमएच ४५ ४७५३) ट्रॉली जोडून मुकादम खिमजी तडवी हा सुखलाल यांची पत्नी सायकू वसावी, मुलगी रिंकू, ऊसतोड जोडीदाराची पत्नी निमा शिवा वसावी, तिचा मुलगा नीतेश, तिला वसंत पाडवी आणि तिचा मुलगा आरव पाडवी यांना घेऊन निघाला होता. मुकादम खिमजी स्वतः ट्रॅक्टर चालवत होता. नागनाथ शिंदे यांच्या शेतात ट्रॅक्टरने तेथील विहिरीला ठोकरले. कठडे तोडून ट्रॅक्टर विहिरीत कोसळला. या वेळी पुरुष मजूर पोहून पाण्यातून बाहेर आले. स्त्रियांनाही पाण्यातून बाहेर काढून वाचविण्यात आले. परंतु त्यांची तिन्ही मुले पाण्यात बुडाली. ग्रामस्थांनी अपघातग्रस्त ट्रॅक्टर जेसीबीच्या साह्याने बाहेर काढला. विहिरीतील पाणी विद्युत मोटारीने उपसण्यात आले. अखेर विहिरीच्या तळात दुर्दैवी बालके सापडली. त्यांना तातडीने नजीकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिघांचाही मृत्यू झाला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three children drowned after tractor falls into well zws