मुस्लीम समाजातील विद्यार्थ्याला त्याच्या वर्गमित्रांकडून थप्पड मारणाऱ्या शिक्षिकेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता महाराष्ट्रातूनही एक गंभीर प्रकार उजेडात आला आहे. या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्हिडीओ ट्वीट केला आहे.
हेही वाचा >> “तडजोड करा, अन्यथा…”, मुस्लीम विद्यार्थ्याच्या वडिलांवर राजकीय दबाव वाढला; राकेश टिकैतांचाही हस्तक्षेप
कबुतर आणि शेळी चोरल्याच्या संशयावरून तीन दलित तरुणांना बेदम मारहाण केल्याचा दावा प्रकाश आंबेडकरांनी ट्विटरद्वारे केला आहे. त्यांनी यासंदर्भातील व्हिडीओही पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणाला बेदम मारहाण करत असल्याचं दिसत असून तो हात जोडून विनंती करताना दिसतोय. आपण निर्दोष असल्याचं वारंवार सांगूनही त्याच्यावर विश्वास ठेवला जात नाहीय. तर, दुसऱ्या व्हिडीओमध्ये त्या मुलाला झाडाला टांगलेलं दिसत आहे.
“महाराष्ट्रात आणखी एक जातीय अत्याचार. हा व्हिडीओ श्रीरामपूर, अहमदनगर येथील आहे, ज्यात एक दलित तरुण हात जोडून आपण निर्दोष असल्याचं सांगत आहे. कबूतर चोरीच्या संशयावरून ३ दलित मुलांना बेदम मारहाण करण्यात आली आणि प्रत्येकाला ४ जणांच्या टोळीने उलटे टांगले. ही घटना जातीय अत्याचार आहे आणि जातिव्यवस्थेमुळेच दलित पोरांना एवढी क्रूर वागणूक दिली आहे. चोरीच्या संशयावरून इतर कुणालाही अशीच मारहाण झाली असती का? नाही!”, असं ट्वीट प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे.
विजय वटेड्डीवार यांचीही टीका
याच प्रकरणावरून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही ट्वीट करून सरकारवर ताशेरे ओढले आहेत. शासन नेमकं कोणाच्या दारी? असा सवाल विचारत विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका केली आहे.
“शेळी कबुतरे चोरल्याच्या संशयावरून श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे तीन दलीत आणि एक मराठा मुलांना अमानुषपणे मारहाण झाल्याची घटना घडली आहे. पुरोगामी राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात घडलेल्या या घटनेचा तीव्र निषेध करतो. महाराष्ट्रात भाजपचे सरकार आहे, गृहमंत्री सुद्धा भाजपचे आहे. ते स्वतः दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देतील की हे प्रकरण सुद्धा इतर प्रकरणांप्रमाने दाबण्यात येईल ? दलित, ओबीसी, आदिवासी भाजपमध्ये वापरासाठी आहेत. त्यांना वापरा आणि फेका अशी भाजपची भूमिका आहे. उपमुख्यमंत्री,गृहमंत्री आपल्या राज्यातील अशा घटनांकडे डोळेझाक करून जपानमध्ये मोठं मोठे वल्गना करतात. इकडे त्यांच्याच राज्यात समाज मन संतप्त करणाऱ्या अश्या दुःखद घटना घडत आहे. या घटना राज्यातील कायदा व सुव्यस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित करणाऱ्या आहे. या घृणास्पद कृत्याला जबाबदार असणाऱ्यांवर त्वरीत आणि कठोर कारवाई करण्यात यावी.अशा घटनांचा केवळ निषेध करणे पुरेसे नाही; गरज आहे ती गुन्हेगारांना शिक्षा देण्याची”, असं वडेट्टीवार म्हणाले.