लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

अलिबाग : मुंबई-गोवा महामार्गावर महाड येथील वीर स्थानकाजवळ मध्यरात्री भीषण अपघात झाला. यात तिघांचा मृत्यू झाला असून तीनजण गंभीर जखमी आहेत. त्यांना महाड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

गाडीतील डिझेल संपल्याने स्कॉर्पिओ जीप वीर स्थानकाजवळ बंद पडली होती. त्यामुळे गाडी रस्त्याच्या कडेला लावून प्रवासी गाडी शेजारी उभे होते. यावेळी मागून आलेल्या भरधाव टोईंग व्हॅनने बंद पडलेल्या स्कॉर्पिओला जोरदार धडक दिली. यात गाडी शेजारी असलेले सहा जण गंभीर जखमी झाले.

आणखी वाचा-मद्यपी वाहनचालकांवर कारवाईचा बडगा…

टोईंग व्हँनची धडक इतकी जोरात होती, की स्कॉर्पिओ गाडी पन्नास फूट लांब जाऊन सर्व्हिस रोडच्या पलीकडे असलेल्या खड्ड्यात जाऊन पडली. या दुर्घटनेत सूर्यकांत मोरे, साहिल शेलार (वय वर्ष २५) आणि प्रसाद नातेकर (वय वर्ष२५) सर्व रहाणार कुंभार आळी, महाड यांचा मृत्यू झाला. तर समिप मिंडे (वय वर्ष ३५) रहाणार दासगाव, सुरज नलावडे (वय वर्ष ३४) रहाणार चांभार खिंड आणि शुभम माटल (वय वर्ष २६) शिरगाव हे जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलीस, तसेच स्थानिक बचाव यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी जखमींना महाड येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यापुर्वी तिघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी टोईंग व्हॅन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.

Story img Loader