अलिबाग: कर्जत तालुक्यातील कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर इनोव्हा गाडीला अपघात झाला. या अपघातात इनोव्हा गाडीमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. त्यांच्यावर पनवेल येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नेरळ ग्रामपंचायतचे सदस्य आणि पत्रकार धर्मानंद गायकवाड हे आपल्या नातेवाईक आणि मित्रांसह नेरळ येथे इनोव्हा गाडीने घरी परत येत होते. पहाटे सव्वा तीन वाजता त्यांची गाडी कर्जत कल्याण राज्य रस्त्याने नेरळकडे येत असताना हा अपघात झाला.
हेही वाचा >>> जन्मठेपेची शिक्षा सोडून तब्बल १७ वर्षं होता फरार; लग्नही केलं, संसारही थाटला…
चालक धर्मानंद गायकवाड यांचा वाहनावरील ताबा सुटला आणि गाडी पनवेल कर्जत रेल्वे मार्गाच्या पुलावरून थेट खाली ३० फूट कोसळली. त्याच वेळी पनवेल येथून कर्जतकडे एक मालवाहू गाडी प्रवास करीत होती. त्यामुळे कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्यावरून कोसळलेली गाडी थेट मालवाहू गाडीवर कोसळली. त्यात मालवाहू गाडीचे कपिलग तुटले आणि त्यामुळे मालगाडी अपघातग्रस्त झाली.
यात पत्रकार धर्मानंद यशवंत गायकवाड, मंगेश जाधव, नितीन जाधव यांचा मृत्यू झाला. तर संतोष सखाराम जाधव, पत्रकार जयवंत रामचंद्र हबाळे हे जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी कामोठे येथे पाठविण्यात आले होते.
पत्रकार आणि राजकारणी
धर्मानंद गायकवाड यांचे मूळ गाव कर्जत तालुक्यातील आसल हे असून त्यांनी नोकरीच्या निमित्ताने नेरळ येथे राहण्यास सुरुवात केली. त्यानंतर नेरळ गावाचे रहिवासी झालेले धर्मानंद यांनी नेरळ ग्रामपंचायतची निवडणूक लढवली असता ते विजय मिळवून ग्रामपंचायत सदस्य म्हणून गेली चार वर्षे कार्यरत होते. त्याच वेळी आरपीआय आठवले गटाचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख म्हणूनदेखील त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. तर पत्रकार म्हणून गेली २२ वर्षे रायगड टाइम्ससारख्या वृत्तपत्रात काम करीत असून रायगड प्रेस क्लब या संघटनेत जिल्हा उपाध्यक्ष, तसेच कर्जत प्रेस क्लबचे अध्यक्ष या पदावर त्यांनी काम केले आहे.