सोलापूर-पुणे लोहमार्गावर शहरानजीक बाळे येथे धावत्या सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या धडकेने तिघा नेपाळी तरुणांचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी ही दुर्घटना घडली.
तिघाही मृतांची ओळख पटली नाही. त्यासाठी सोलापूर रेल्वे पोलीस नेपाळशी संपर्क साधत आहेत. या तिघा दुर्दैवी नेपाळी तरुणांचा आणखी एक सहकारी रेल्वेखाली पडला असता त्याचा शोध घेण्यासाठी हे तिघे जण लोहमार्गावरून पायी चालत सोलापूर येथून बाळे येथे निघाले होते. त्या वेळी रेल्वे पुलावरून पुढे जात असताना पाठीमागून येणाऱ्या बंगळुरू-नवी दिल्ली के. के. सुपरफास्ट एक्स्प्रेसखाली तिघेही जण चेंगरले गेले.
या दुर्घटनेची माहिती मिळताच सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी धाव घेऊन तिन्ही मृतदेह ताब्यात घेतले. मृतांच्या जवळ काही सामान व कागदपत्रे आढळून आली. त्यांच्याकडे नवी दिल्ली-बंगळुरू के. के. एक्स्प्रेसच्या प्रवासाची तिकिटे सापडली. मोबाइल संचही आढळून आला.
यासंदर्भात सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे तिघे नेपाळी तरुण आपल्या आणखी एका तरुण सहकाऱ्यासह नवी दिल्लीहून बंगळुरूकडे के. के. एक्स्प्रेसने जात होते. परंतु सोलापूरच्या अलीकडे बाळेनजीक पहाटे साडेतीनच्या सुमारास धावत्या रेल्वेतून त्यांचा चौथा सहकारी रेल्वेतून कोसळला. त्यामुळे हे तिघे सोलापूर स्थानकावर उतरले आणि रेल्वेतून खाली पडलेल्या आपल्या चौथ्या सहकाऱ्याचा शोध घेण्यासाठी सोलापूर ते बाळे येथे लोहमार्गावरून पायी चालत निघाले होते. बाळेजवळ लोहमार्गावर असतानाच पाठीमागून आलेल्या बंगळुरू-नवी दिल्ली एक्स्प्रेसने तिघांना ठोकरले.

Story img Loader