गिरणा धरण परिसरात पर्यटनासाठी गेलेल्या येथील कॅम्प भागातील एकाच कुटुंबातील तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. फारूख निसार पटेल (३०), त्यांची पत्नी हिना (२५) आणि मेहुणे रोईन गनी तांबोळी (३०) यांच्यासह पटेल कुटुंबातील सदस्य मंगळवारी दुपारी गिरणा धरण परिसरात फिरण्यासाठी गेले होते. सायंकाळी फारूख व रोईन हे धरणात पोहण्यासाठी उतरले असता पाण्यातील खोलीचा अंदाज न आल्याने गटांगळ्या खाऊ लागले. काठावर बसलेल्या हिनाचे लक्ष त्यांच्याकडे जाताच पती व भावाला वाचविण्यासाठी ती पुढे सरसावली. परंतु त्यांच्यासह ती देखील बुडाली. धरणाच्या काठावर असलेल्या वृध्द महिलांसह लहान मुलांनी आरडाओरड केल्यावर नागरिक धावून आले. त्यांनी मालेगावच्या अग्निशामक दलाला या घटनेची खबर दिली. रात्री उशिरा या तिघांचे मृतदेह शोधण्यात यश आले. तालुका पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

 

Story img Loader