सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी महापौर सुरेश पाटील यांच्यासह तीन माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महापालिका क्षेत्रातील प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या गटाची मोठी पडझड झाली आहे.
राष्ट्रवादीचे (अजितदादा गट) शहर जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे, माजी महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांच्यासमवेत माजी महापौर पाटील, माजी नगरसेवक हणमंत पवार, विष्णु माने, कुपवाडचे गजानन मगदूम यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री पवार यांची कोल्हापूर येथे भेट घेतली. यावेळी पक्ष प्रवेशाबाबत प्राथमिक चर्चा करण्यात आली. याबाबत पाटील यांना विचारले असता मंगळवारी मुंबईतील देवगिरी या उपमुख्यमंत्री पवार यांच्या शासकीय निवासस्थानी पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे. या दरम्यान, आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष आमदार पाटील यांना पाठविणार आहे.
या राजकीय घडामोडीमुळे महापालिका क्षेत्रात आमदार पाटील यांच्या गटाची मोठी पडझड सुरू झाली असून फेब्रुवारी महिन्यात उपमुख्यमंत्री पवार यांच्या सांगली दौर्यावेळी आणखी काही माजी नगरसेवक या गटात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. जगदाळे यांनी सांगितले. अजितदादा यांच्या गटामध्ये आतापर्यंत चार माजी महापौर सहभागी झाले आहेत. आणखी काही नवे चेहरे लवकरच पक्षात सहभागी होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.